होमपेज › Pune › गर्भवतींना मिळणार आता पाच हजार

गर्भवतींना मिळणार आता पाच हजार

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 10 2018 1:34AMपुणे : प्रतिनिधी

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना आता पुणे शहरासह राज्यातील 26 महापालिकांमध्ये सुरू करण्यात आली असून, त्याद्वारे शासकीय सेवेतील महिला वगळून प्रत्येक गर्भवतींना तीन टप्प्यांत पाच हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. सहा महिन्यांपूर्वी ग्रामीण भागात सुरू झालेल्या या योजनेचा आतापर्यंत राज्यात दोन लाख 31 हजार गर्भवती व मातांना लाभ मिळाला असल्याची माहिती राज्य कुटुंब कल्याण विभागाने दिली. 

माता व बालमृत्यू रोखणे, सुरक्षित प्रसूती यासाठी राज्यात ‘प्रधानमंत्री मातृ वंदना’ योजना डिसेंबरपासून अंमलात आणली. या योजनेंतर्गत आतापर्यंत पुण्यात 19 हजार 366 तर राज्यात दोन लाख 31 हजार 471 महिलांना लाभ मिळाला आहे. त्यासाठी राज्याला या वर्षासाठी 205 कोटींचे बजेट दिले असून, त्यापैकी 45 कोटी 74 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. रुग्णालयात नोंदणी व प्रसूती झालेल्या महिलांना तीन टप्प्यांत पाच हजार रुपये दिले जातात.

गरिबीमुळे कुपोषण आणि कुपोषणामुळे गर्भवती व बालकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. तसेच गरीब गर्भवती विशेषतः ग्रामीण भाग व शहरातील झोपडपट्ट्यांतील अनेक गर्भवती बाळंतपणापर्यंत काम करत राहतात. त्याचबरोबर बाळाच्या जन्मानंतरही लवकरच कामास सुरुवात करतात. गर्भवतीला पोषण आहार घेण्यासाठी आर्थिक मदत मिळावी, आराम मिळावा या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.

योजनेची वैशिष्ट्ये

बँक खाते आणि आधार आवश्यक.
30 दिवसांत पैसे जमा. 
वर्षाला राज्यात सहा लाख लाभार्थी अपेक्षित.
शासकीय सेवेतील वगळता सर्व गर्भवतींसाठी.
मध्यस्थी कोणी नाही. 
जानेवारी 2017 पासूनच्या सर्व गर्भवतींना लाभ मिळेल.
डिलिव्हरीपासून 370 दिवसांपर्यंत फॉर्म भरू शकता.

असा घ्या लाभ

मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 150 दिवसांच्या आत गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर पहिला हप्ता एक हजार रुपये. शहरातील अथवा ग्रामीण भागातील दवाखाने, आशा यांच्याकडे एक फॉर्म भरून नोंदणी करा. यानंतर किमान एकदा सोनोग्राफी केल्यावर व गर्भधारणेचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता 2 हजार रुपये. प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व त्याला बीसीजी, ओपीव्ही, डीपीटी आणि हिपॅटायटीस बी किंवा त्या अनुषंगिक लसीकरणाचा पहिला डोस दिल्यानंतर तिसरा हप्‍ता 2 हजार रुपयांची रक्कम मिळते. लाभार्थी महिलेची शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास त्यांना जननी सुरक्षा योजनेंतर्गत लाभ पूर्वीप्रमाणेच मिळतो.