होमपेज › Pune › सत्तेमुळे भाजपचा मस्तवालपणा वाढला

सत्तेमुळे भाजपचा मस्तवालपणा वाढला

Published On: Sep 08 2018 1:33AM | Last Updated: Sep 08 2018 1:12AMपिंपरी : प्रतिनिधी

भाजपला फक्‍त बहुमताची काळजी आहे. लोकांचे प्रश्‍न, त्यावर होणार्‍या आंदोलनाची दखल ते घेत नाहीत. सत्तेतून पैसा व पैसा कमवून सत्ता मिळविण्याचे स्वप्न भाजपवाले बघत आहेत. त्यामुळे त्यांचा मस्तवालपणा वाढत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी जनसंघर्ष यात्रेद्वारे भाजपवर केली. 

केंद्र व राज्य सरकारने निवडणूक काळात दिलेली आश्‍वासने पाळली नाहीत. त्या विरोधात काँग्रेसच्या वतीने सुरू केलेली जनसंघर्ष यात्रेचे शुक्रवारी (दि. 7) पिंपरीत आगमन झाले. या वेळी खा. चव्हाण बोलत होते. 

या प्रसंगी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, प्रवक्‍ते रत्नाकर महाजन, आमदार संग्राम थोपटे, आमदार भारत भालके, शरद रणपिसे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन साठे, कैलास कदम, माजी महापौर कवीचंद भाट आदींसह काँग्रसचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

खा. चव्हाण म्हणाले की, जनतेला भाजप व शिवसेनेला भिडणारा पक्ष पाहिजे. काँग्रेसकडे त्या आशेने लोक बघत आहेत. निवडणुक काळात भाजपने घोषणांचा पाऊस पाडला. त्यापैकी 99 टक्के जाहिराती बोगस असून आश्‍वासनांची पुर्तता केली नाही. देशात सर्वात जास्त बेकारी आहे. मुख्यमंत्री फडणवीस साम-दाम-दंड भेदाची भाषा करतात. मशीनमध्ये घोटाळा असल्याने ते बदलण्याची भावना नागरिकांमध्ये आहे. सामाजिक एकोपा हेच भाजपला चोख उत्‍तर आहे. पिंपरी-चिंचवड मध्ये प्रा. रामकृष्ण मोरे यांनी काँग्रेस वाढविल्याची आठवण या वेळी खा. चव्हाण यांनी काढली.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, भाजप काळात शेतीची हलाखीची परिस्थिती झाली. नोटबंदीचा अविचारी निर्णय घेतला. त्यांच्या काळात 4 लाख कोटीचे कर्ज 11 लाख कोटीवर गेले. महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले. मोदी हुकुमशहा आहेत. त्यांच्या विषयी ग्रामीण भागासह शहरातही नाराजी आहे. जीएसटी बिलाला सर्वात अगोदर नरेंद्र मोदी यांनी विरोध केला. विरोधकांच्या एकीने मोदींना येत्या निवडणुकीत हरविणार असल्याचे या वेळी चव्हाण म्हणाले.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहर पुर्वी काँग्रेसचा बालेकिल्‍ला आहे. केंद्रातील पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्यामुळे शहरात पक्षाची पिछेहाट झाली. शहरात काही जण पक्षात राहून इतरांशी संसार करत होते. नंतर पक्ष सोडूनही गेले. भविष्यात अशा गद्दारांना पक्षात थारा देणार नाही. सचिन साठे पक्षाबाबत सोडण्याचा विचार न करता पक्ष वाढविण्याचा विचार करा, असे आवाहन पाटील यांनी केले.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, तरुणांनी पडत्या काळात पक्षाच्या पाठिशी रहावे. त्यामुळे मोठी संधी मिळेल. भविष्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री व पंतप्रधान होणार आहे. राजकारणात ठराविक काळासाठी आलेल्या लाटा टिकत नाहीत. नोटबंदीचा पिंपरी औद्योगिक परिसराला फटका बसला. भाजप काळात झुंडशाही वाढली. 

सचिन साठे म्हणाले की, महापालिका निवडणुकीत भाजपने दिलेले आश्‍वासन पाळले नाहीत. रेडझोन, अनधिकृत बांधकामाचे प्रश्‍न तसेच आहेत. पंतप्रधान आवास योजना व कचर्‍यामध्ये घोटाळा केला. ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांनाच पक्षात घेतले. शहरात भविष्यात आघाडी करताना कार्यकर्त्यांचा सन्मान करावा. सन्मान नाही झाला तरी चालेल मात्र अपमान करू नका, असे साठे यांनी या 
वेळी सांगितले.