Tue, Apr 23, 2019 23:32होमपेज › Pune › वीजमीटरची टंचाई खरी की खोटी? 

वीजमीटरची टंचाई खरी की खोटी? 

Published On: Jan 20 2018 1:41AM | Last Updated: Jan 20 2018 12:38AMपुणे : शिवाजी शिंदे

नवीन वीजजोडणीसाठी केली जाणारी मागणी कधीच वेळेवर पूर्ण होत नसल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून वाढत आहेत. किंबहुना वीजमीटरचा तुटवडा असल्याचे भासवून जोडणीसाठी अडवणूक केली जाते, असेही ग्राहकांचे म्हणणे आहे. याउलट महावितरण वीज कंपनीने मात्र प्रत्यक्षात मागणीच्या चौपट वीजमीटर कंपनीकडे आलेले असल्याचा दावा करून मीटरच्या तुटवड्याचे, दिरंगाईचे, भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळले आहेत. या संदर्भात ‘पुढारी’कडे आलेल्या माहितीनुसार मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी अवस्था सध्या शहरात आणि उपनगरात पाहावयास मिळत आहे. महावितरण कंपनीचा दावा वेगळा, तरी पाहण्यासाठी अभियंते आणि वायरमन तसदी घेत नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. 

वीज जोडणीचे काम तातडीने व्हावे यासाठी सक्षम कर्मचारी नेमलेले आहेत. सर्व अत्याधुनिक तंत्राचा वापरसुध्दा केला आहे. असे असले तरी वीजजोडणी आणि त्यासाठी अत्यंत गरजेचा असलेला वीजमीटर वेळेवर उपलब्ध होत नाही. परिणामी नागरिकांना महावितरणच्या उपकार्यालयांकडे हेलपाटे मारण्याची वेळ येत आहे.

पुणे शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अनेक उपनगरांमधून बांधकामे मोठ्या  प्रमाणावर वाढत आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी बांधलेल्या सदनिकांमध्ये वीज जोडणी महावितरणकडून तुलनेने त्वरीत पुरविली जाते. मात्र सर्वसामान्य नागरिकांनी बांधलेल्या घरामध्ये वीजजोडणी त्याचबरोबर वीजमीटर वेळेत मिळत नाही. त्याचबरोबर घरगुती वीजमीटरची दुरूस्ती, वीजमीटर बदलणे, ही कामे कायमच प्रलंबित राहिलेली असतात.

नागरिकांच्या वीजमीटरची कामे करण्यासाठी तांत्रिक कर्मचार्‍यांची नियुक्ती  केलेली असते. या  कर्मचार्‍यांचे कामच वीजमीटरची दुरूस्ती करणे तसेच नवीन वीजमीटर नागरिकांना बसवून देणे हे आहे. मात्र या कर्मचार्‍यांकडून ही कामे वेळेवर होत नाहीत. महावितरणच्या कर्मचार्‍यांकडून (वायरमन) नागरिकांची वीजजोडणी आणि वीजमीटर देण्याची कामे वेळेवर झाली तर त्यांच्यावर उपकार्यालयात हेलपाटे मारण्याची वेळ येणारच नाही. मात्र  अभियंते आणि कर्मचार्‍यांच्या   मनमानीमुळे, तसेच चिरीमीरी दिल्याशिवाय काम होत नाही, असे काही ग्राहकांनीच सांगितले.