Sat, Aug 24, 2019 19:46होमपेज › Pune › मान्सून 6 जूनपर्यंत मुंबईत पोहोचण्याची शक्यता 

मान्सून 6 जूनपर्यंत मुंबईत पोहोचण्याची शक्यता 

Published On: May 30 2018 2:21AM | Last Updated: May 30 2018 1:11AMपुणे / मुंबई : प्रतिनिधी 

दरवर्षी सर्वसाधारणपणे 1 जून रोजी पोहोचणारा नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) यंदा तीन दिवस आधीच, मंगळवारी केरळमध्ये दाखल झाल्याची अधिकृत घोषणा हवामान खात्याने केली आहे. गेल्या वर्षीही मान्सून दोन दिवस आधीच केरळात पोहोचला होता. ‘स्कायमेट’ने कालच मान्सून केरळात पोहोचल्याची घोषणा केली होती. येत्या दोन दिवसात तो कोंकणात पोहोचेल, तर सहा जूनपर्यंत मुंबईत धडकेल, असा ‘स्कायमेट’चा अंदाज आहे. 

हवामान खात्याने मंगळवारी जारी केलेले अंदाजही ‘स्कायमेट’च्या घोषणेला पुष्टी देणारेच आहेत. मान्सून दरवर्षी 5 जून रोजी दक्षिण कोकणात तर 7 जून रोजी पुणे व मुंबई येथे पोहोचतो. 15 जूनपर्यंत विदर्भासह संपूर्ण राज्य मान्सूनने व्यापले जाते. यंदा 25 मे रोजी मान्सून अंदमानात धडकला होता. मात्र, मेकुनू चक्रीवादळामुळे केरळच्या दिशेने येणारे बाष्पयुक्त ढग ओमानच्या दिशेने ओढून नेले. दोन दिवसांपूर्वी अरबी समुद्रात केरळ ते कर्नाटक किनारपट्टीदरम्यान निर्माण झालेले समांतर कमी दाबाचे क्षेत्र मंगळवारी देखील स्थिर होते. त्याच्याच प्रभावामुळे केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याचे हवामान खात्याने सांगितले. 10 मे नंतर केरळमधील 14 वेधशाळांच्या क्षेत्रांपैकी 60 टक्के क्षेत्रात सलग दोन दिवस 2.5 मिलीमीटर इतका पाऊस पडल्यास हवामान खात्यातर्फे मान्सूनच्या आगमनाची घोषणा केली जाते.

केरळप्रमाणेच दक्षिण पूर्व अरबी समुद्राचा उर्वरित भाग, कोमोरीन-मालदीव, संपूर्ण लक्षद्वीप, तामिळनाडूचा काही भाग, दक्षिण पश्चिवम, मध्य व उत्तर पूर्व बंगालचा उपसागर येथे मान्सून पोहोचल्याचे जाहीर करण्यात आले. मान्सूनची उत्तर सीमा मंगळवारी कन्नूर, कोइम्बतूर, तुतीकोरीन अशी होती.पुढील 48 तासात मध्य अरबी समुद्राचा आणखी भाग, दक्षिण व अंतर्गत कर्नाटक, ईशान्य भारताचा काही भाग येथे मान्सून पोहोचण्यास अनुकूल वातावरण असल्याचे हवामान विभागाने सांगितले. येत्या 24 तासात पूर्व मध्य व लगतच्या परिसरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असून बंगालच्या उपसागरात 2-3 दिवस मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. 

केरळमध्ये मान्सूनचे 3 दिवस आधीच आगमन तर झालेच आहे, शिवाय सध्या बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मान्सून येत्या 2 दिवसातच कर्नाटकात दाखल होईल. त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सून वेळेवर दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान बदल व संशोधन विभागाकॅहे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. ए. के. श्रीवास्तव यांनी सांगितले.  केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सून 24 ते 48 तासात दक्षिण अरबी समुद्र, तामिळनाडू किनारपट्टी, मालदीव-लक्षद्वीप बेटे आदी मार्गाने पुढे वाटचाल करतो. या अनुमानानुसार, पुढील आठवड्यात मान्सून मुंबईत दाखल झालेला असेल. तर पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. 

दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस सुरूच आहे. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. पुढील पाचही दिवस संपूर्ण राज्यात पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. येत्या 24 तासात कोकणातील सिंधूदुर्गमध्ये वादळी वारा व गडगडटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे ’स्कायमेट’ने म्हटले आहे. भारतीय हवामान विभागाकडून गेल्या काही वर्षांत जाहीर केलेला मान्सूनचा अंदाज 20115 वगळता खरा ठरला आहे. गेल्या वर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 30 मे रोजीच मान्सून केरळात पोहोचला होता.