होमपेज › Pune › निगडीपर्यंत मेट्रोची शक्यता वाढली

निगडीपर्यंत मेट्रोची शक्यता वाढली

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरीऐवजी थेट निगडीपर्यंत मेट्रो मार्गिकेचे काम करण्यासंदर्भात महामेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अधिकार्‍यांसमवेत शनिवारी (दि. 2) बैठक घेण्यात येणार आहे. त्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी (दि. 27) सांगितले. 

महापालिका भवनात आढावा बैठक झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. महापालिकेच्या स्थायी समितीने पुणे मेट्रो व आयुक्त हर्डीकर यांना शुक्रवारी (दि. 24) पत्र दिले आहे. पिंपरी ते निगडी या सुमारे 5 किलोमीटर अंतराच्या मेट्रो मार्गिका, स्थानके आदींच्या वाढीव मार्गाचा खर्चाचा डीपीआर तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  या संदर्भात ‘पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रो नेण्यास अधिकारीही अनुकूल’ हे ठळक वृत्त   ‘पुढारी’ने रविवारी (दि. 26) प्रसिद्ध केले होते. यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. त्यास पालकमंत्री बापट यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. 

या विषयावर महामेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासोबत पिंपरी-चिंचवड शहरात येत्या शनिवारी बैठक आयोजित केली आहे. त्यामध्ये या विषयावर सविस्तर चर्चा होऊन त्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे बापट यांनी सांगितले. 

आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले की, यामध्ये प्रमुख मुद्दा केंद्राच्या मान्यतेचा आहे. तसेच, वाढीव खर्चाच्या निधीची तरतूद कशी केली जाणार हे निश्‍चित होणे महत्त्वाचे आहे. पिंपरी ते निगडी या मेट्रो कामाच्या वाढीव खर्चाची जबाबदारी घेण्यास गरज पडल्यास महापालिका तयार असल्याचे सांगून सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले की, आवश्यक निधीची इतर माध्यमातून उभारणी केली जाईल. 

महापौर नितीन काळजे म्हणाले की, पुणे मेट्रोच्या सर्वच कामाचे भूमिपूजन आणि कार्यक्रम पुणे शहरात झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात अद्याप एकही कार्यक्रम झालेला नाही; त्यामुळे शहरात कार्यक्रम घेण्याची आग्रही मागणी त्यांनी केली. शनिवारी शहरातील पुणे मेट्रोच्या एका स्थानकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याच दिवशी निगडीपर्यंत मेट्रो कामांच्या खर्चाबाबत चर्चा होणार आहे.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भोसरी येथे झालेल्या महापालिकेच्या विविध प्रकल्पांच्या ऑनलाईन उद्घाटनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री बापट यांनी पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रोचे काम केले जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले होते. निगडीपर्यंतचा विचार सोडून देण्याचा सल्ला त्यांनी शहरवासीयांना दिला होता. मात्र, आता त्यांच्या भूमिकेत बदल झाल्याचे दिसत आहे.