होमपेज › Pune › फेरपरीक्षांचा फेरविचार होण्याची शक्यता

फेरपरीक्षांचा फेरविचार होण्याची शक्यता

Published On: Aug 29 2018 1:43AM | Last Updated: Aug 29 2018 1:18AMपुणे : गणेश खळदकर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून गेल्या तीन वर्षांपासून दहावी तसेच बारावीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षेचे आयोजन करण्यात येते. परंतु या फेरपरीक्षेत उत्तीर्ण होण्याचा टक्का एक चतुर्थांश देखील असल्याचे दिसत नाही. परंतु मंडळाला मात्र या परीक्षांसाठी संपूर्ण प्रक्रिया करावी लागते. त्यामुळे या फेरपरीक्षांचा पुन्हा एकदा फेरविचार करून फेरपरीक्षा बंद करण्यात यावी, अशा प्रकारचा प्रस्ताव मंडळाच्या नऊ विभागीय अध्यक्षांमार्फत राज्य मंडळाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय मंडळातील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची नियमित परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना थेट पुढच्या वर्षीच फेरपरीक्षा द्यावी लागत होती. यामध्ये विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जात होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी शासनाकडून गेल्या तीन वर्षांपासून नियमित परीक्षा झाल्यानंतर लगेचच जुलै-ऑगस्ट महिन्यात फेरपरीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत जे विद्यार्थी उत्तीर्ण होतात त्यांचे वर्ष वाया जात नाही. त्यांना पुढील प्रवेशाची संधी मिळते. परंतु या परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांचा टक्का कमीच आहे.

यासंदर्भात राज्य मंडळाच्या अखत्यारित असलेल्या एका विभागीय अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, फेरपरीक्षांचा आढावा घेतला असता विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी कमी आहे. बारावी फेरपरीक्षेचा विचार केला. तर 2016 मध्ये 27.03 टक्के, 2017 मध्ये 24.96 टक्के तर 2018 मध्ये 22.65 टक्के निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी फारच कमी कालावधी मिळत आहे. ऐन जुन-जुलै महिन्यात विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची लगबग असल्यामुळे पेपर तपासण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाकडून घाईगडबडीत पेपर तपासले जातात. यात विद्याथ्यार्र्ंचे योग्य मूल्यमापन होत नाही. त्यातच दहावीचे जे विद्यार्थी एटीकेटीमध्ये उत्तीर्ण होतात. त्यातील अनेक विद्यार्थी अकरावीत जातात. परंतु त्यांना दहावीचे विषय देखील सोडवता येत नाहीत. परिणामी यातील अनेक विद्यार्थी हे बारावीच्या परीक्षेसाठी देखील पात्र होत नाहीत. त्यासाठीच सध्या घेण्यात येणार्‍या फेरपरीक्षांचा विचार व्हावा, असा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.