Thu, Jun 20, 2019 06:31होमपेज › Pune › महाराष्ट्रात मान्सून ४ दिवस लवकर येण्याची शक्यता

महाराष्ट्रात मान्सून ४ दिवस लवकर येण्याची शक्यता

Published On: May 19 2018 1:35AM | Last Updated: May 19 2018 1:17AMपुणे : प्रतिनिधी 

मान्सून अंदमान, निकोबार तसेच बंगालच्या उपसागरात दाखल होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यानुसार मान्सून महाराष्ट्रात चार दिवस आधीच दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

यावर्षी अंदमान निकोबार बेटांवर 23 मे रोजी  तर केरळमध्ये 29 मेच्या आसपास मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढील चार दिवसांतच कोकणात धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

गेल्या वर्षी केरळमध्ये वेळापत्रकाच्या दोन दिवस अगोदर 30 मे रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. केरळ किनारपट्टीजवळ 25 ते 27 मे दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून, मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्‍त करण्यात आला आहे.

विदर्भात उष्णतेची लाट कायम; कोकणात पाऊस

राज्यातील  विदर्भाच्या काही भागात  पुढील दोन  दिवसात  तीव्र उष्णतेची लाट कायम राहणार आहे. तर दक्षिण कोकण तसेच  गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाउस पडणार आहे. असा  अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मागील काही दिवसांपासून राज्याच्या काही भागात अवकाळी पावसानेअ चांगलीच हजेरी लावली आहे .तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात उष्णतेची लाट सुरूच राहिली आहे. गुरूवारी दुपारनंतर कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाने  हजेरी लावली आहे. त्यामुळे किमान तापमानात किंचित घट झाली आहे. विदर्भात शुक्रवारी सुध्दा काही भागात  उष्णतेची लाट कायम राहिली आहे.

शुक्रवारी मध्य-महाराष्ट्राच्या काही भाग,विदर्भाच्या उर्वरीत भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय तर कोकण,मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. शुक्रवारी चंद्रपुर येथे उच्चांकी 47.4 अंश आणि महाबळेश्वर येथे निचांकी 16.0 अंश सेल्सिअस तामानाची नोंद झाली आहे.