Sun, Jul 21, 2019 12:01



होमपेज › Pune › आबासाहेब गरवारे महाविद्यालयात ५ सप्टेंबरला आयोजन

सत्यनारायण पूजेवरून पुन्हा वादाची शक्यता

Published On: Aug 29 2018 1:44AM | Last Updated: Aug 29 2018 1:00AM



पुणे : प्रतिनिधी 

फर्ग्युसन महाविद्यालयातील सत्यनारायण पूजेवरून निर्माण झालेला वाद ताजा असतानाच शहरातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात येत्या 5 सप्टेंबर रोजी सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात आल्याची सूचना नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे. त्यातच मंगळवारी पतितपावन संघटनेतर्फे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर सत्यनारायण पूजा घालून समर्थन केले. त्यामुळे सत्यनारायण पूजेवरून विद्यार्थी संघटना आमने-समाने आल्याने पुन्हा एकदा वादाची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या आठवड्यात शुक्रवारी फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायण पूजा घालण्यात आली. या पूजेस महाविद्यालय प्रशासन धार्मिक उदात्तीकरण करत असल्याचा आक्षेप घेऊन काही विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेतला. महाविद्यालयाने त्याबाबत स्पष्टीकरणही दिले. या वादाच्या पार्श्वभूमीवर, पतितपावन संघटनेने फर्ग्युसनच्या प्रवेशद्वारावर पूजा घातली आहे. ‘हिंदूंच्या सणांवर आजवर अनेक वेळा संघटनांकडून आक्षेप घेतला गेला. त्याला उत्तर म्हणून सत्यनारायण पूजा घालण्यात आली असल्याचे संघटनेमार्फत सांगण्यात आले आहे.  

सत्यनारायण पूजेवरून उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील प्राचार्या डॉ. मुक्तजा मठकरी यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना पत्र दिले आहे. यामध्ये श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा, दिपावलीमध्ये धनत्रयोदशी आणि गणपती स्थापना हे सण साजरे करण्याबाबत शिक्षकेतर कर्मचारी आणि काही शिक्षकांनी सह्या करून निवेदन सादर केले आहे. तरी सामाजिक परिस्थितीचा विचार करून सण साजरे करण्याबाबत सुस्पष्ट मार्गदर्शन करावे,’असे या पत्रात नमूद केले आहे. परंतु पूजा रद्द केल्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे महाविद्यालयात पूजा होणार की नाही, याबबत संभ्रम निर्माण झाला आहे. तर विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी सत्यनारायण पूजेचा विरोध करणार असल्याचे सांगितले आहे. एकंदरीत महाविद्यालयात सत्यनारायण पूजा करावी, असे मत असणार्‍या संघटना आणि पूजा करू नये, असे म्हणणार्‍या संघटना एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या असून सत्यनारायण पूजेवरून पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.