Thu, Sep 20, 2018 21:54



होमपेज › Pune › पोलिस अधिकारी, शिपायाला जमावाची मारहाण 

पोलिस अधिकारी, शिपायाला जमावाची मारहाण 

Published On: Jun 16 2018 1:31AM | Last Updated: Jun 16 2018 1:08AM



चाकण : वार्ताहर 

खालुंब्रे (ता. खेड) येथे पुणे ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका अधिकार्‍यासह एका पोलिस शिपायाला संतप्त जमावाने गुरुवारी (दि. 14) रात्री नऊच्या सुमारास बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. दोघेही या मारहाणीत जखमी झाले आहेत. तब्बल 25 अनोळखी पुरुष व त्यांचे साथीदार आणि तीन महिलांवर  वये मारहाण व सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पण पोलिसांकडून या घटनेबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.  स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात मोटार वाहन चालक असलेल्या एका पोलीस शिपायाने या बाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असल्याची माहिती प्राप्त होत आहे.  

याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.14) रात्री पावणेनऊ वाजणेचे सुमारास खालुंब्रे (ता. खेड) गावातील तुळवे वस्ती येथे तळेगाव चाकण रस्त्याच्या कडेला ट्रॅक्टरची (एमएच 14 एव्ही 8683) धडक बसल्याने मोटारसायकल (एमएच 14 एफझेड 2547) वरील चालक गंभीर जखमी झाला. मात्र जखमींना मदत न करता संबंधित ट्रॅक्टर चालक पळून जात असल्याचे दिसून आल्याने संबंधित पुणे ग्रामीण पोलिस दलातील एलसीबीचे एक अधिकारी व एक कर्मचारी यांनी त्यास थांबविले. मात्र अपघात झाल्यानंतर थांबविल्याच्या कारणावरून चिडलेल्या संबंधित ट्रॅक्टर चालक व समवेत असलेले अन्य पाच जण व त्यांचे गावातील सुमारे 15 ते  20 साथीदार आणि 2 ते 3 महिला आदींच्या जमावाने संबंधित पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

पोलिसांनी या प्रकरणी शुक्रवारी (दि. 15) सायंकाळपर्यंत सुमारे पाच ते सात जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संबंधित व्यक्ती या पोलिस आहेत याची माहिती नसल्याने हा प्रकार घडल्याची माहिती खालुंब्रे ( ता. खेड) गावातून मिळत आहे. मात्र पोलीस असल्याचे सांगण्यात आल्यानंतर व संबंधितांकडे पोलीस वाहन असल्याचे दिसत असतानाही मारहाण करण्यात आल्याची चर्चा पोलीस वर्तुळातून समोर येत आहे.