Fri, Apr 26, 2019 03:24होमपेज › Pune › पुणे रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्म आता होणार ६१० मीटरचे

पुणे रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्म आता होणार ६१० मीटरचे

Published On: Jul 30 2018 1:31AM | Last Updated: Jul 29 2018 10:55PMपुणे : प्रतिनिधी

पुणे रेल्वेस्थानकात प्लॅटफॉर्म एक हा 610 मीटर लांबीचा असून त्यावर 26 कोचच्या रेल्वे थांबू  शकतात.  अन्य प्लॅटफॉर्म लांब नसल्याने अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या 26 कोचच्या आहेत, त्यांना लाल सिग्नल दिला जातो व आउटरला थांबविले जाते. प्लॅटफॉर्म एक रिकामा झाल्यानंतरच त्या गाड्यांना हिरवा सिग्नल मिळतो. यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो व नाहक मनस्ताप होतो. मात्र, आता हे  चित्र बदलणार आहे. सर्वच प्लॅटफॉर्म आता 610 मीटर लांबीचे करण्यात येणार आहेत.

दरम्यान, प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी रेल्वे बोर्डाकडून 50 कोटी मंजूर झाले असून लांबी वाढविण्याच्या कामास 6-7 महिन्यांपूर्वी सुरुवात झाली आहे. मार्च 2019 पर्यंत हे काम पूर्णत्वास येणार असल्याची माहिती देण्यात आली. सर्व प्लॅटफॉर्मची लांबी वाढविल्यानंतर  फेर्‍या वाढविण्यात येतील, तसेच नव्या रेल्वेदेखील सुरू करता येतील, अशी माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली आहे.

सध्या प्लॅटफॉर्म दोन 510 मीटर लांबीचा असून त्यावर 22 कोच, प्लॅटफॉर्म तीन 555 मीटर लांबीचा असून त्यावर 23 कोच, प्लॅटफॉर्म चार 445 मीटर लांबीचा असून त्यावर 19 कोच, प्लॅटफॉर्म पाच 445 मीटर लांबीचा असून त्यावर 19 कोच आणि प्लॅटफॉर्म सहा 512 मीटर लांबीचा असून त्यावर 22 कोचच्या रेल्वे थांबू शकतात. मात्र, आता प्लॅटफॉर्म 2 ते 6 पर्यंतच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवल्यानंतर 26 कोचच्या रेल्वे येथे थांबू शकतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. 

पुणे यार्डात डायमंड क्रॉसिंग असल्याने तेथून गाडी जात असताना ताशी 10 ते 15 किलोमीटर वेगच राखावा लागतो. रिमॉडेलिंगनंतर ही समस्या सोडविली जाणार असून यार्डातून पुढे जाणार्‍या रेल्वेचा वेगही वाढून तो ताशी 30 किलोमीटरपर्यंत होणार आहे. पुणे स्थानकावर सध्या मालगाडी मावू शकत नसून तिला शिवाजीनगर स्थानकात पाठविले जाते.  यार्ड रिमॉडेलिंगनंतर तिला यार्डात किंवा पुणे स्थानकावर थांबविता येऊ शकेल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.