होमपेज › Pune › वाहनांची तोडफोड शहराला लागलेली कीड

वाहनांची तोडफोड शहराला लागलेली कीड

Published On: Apr 25 2018 11:54PM | Last Updated: Apr 25 2018 11:46PMपिंपरी : अमोल येलमार

पिंपरी-चिंचवड शहरात कायदा व सुव्यवस्थेचे गुन्हेगारांनी अक्षरशः धिंडवडे उडवले आहेत. पोलिसांच्या नाकावर टिचून शहरात सर्रासपणे वाहनांची तोडफोड सुरू आहे. कारागृहात शिक्षा भोगत असताना जामिनावर सुटलेले गुन्हेगार रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करून दहशत माजवत आहेत. मागील वर्षभरात शहरात अनेक ठिकाणी वाहनांची तोडफोड, जाळपोळीच्या घटना घडल्या असून, हे सत्र आजही तसेच सुरू आहे. शहरातील पोलिस यंत्रणा शहराला लागलेली तोडफोडीची कीड काढणार का, असा प्रश्‍न उपस्थित झालेला आहे.

मंगळवारी पहाटे निगडी घरकुल येथील दोन टेम्पोची तर ताथवडे येथे 13 वाहनांची तोडफोड करण्यात आली. त्याअगोदर पिंपरी खराळवाडी परिसरात 35 ते 40 वाहनांची तोडफोड करण्यात आली. पिंपरी, वाकड पोलिसांनी तत्काळ तोडफोड करणार्‍यांना अटक केली. यापुर्वी वर्षभरात पिंपळे-निलखमध्ये 13 वाहनांची तोडफोड करण्यात आली. थेरगावात सात जणांच्या टोळक्याकडून आठ वाहनांची तोडफोड झाली. वाल्हेकरवाडीत टोळक्याने सहा वाहनांची तोडफोड केली, निगडी, दापोडीत चार वाहनांची तोडफोड, भोसरीत टोळक्याकडून चार वाहने, दुकानांची तोडफोड, चिंचवडगावात दहा मोटारींची तोडफोड केल्याप्रकरणी 13 जणांना अटक केली. चिखलीत पीएमपीएमएलसह चार वाहनांची तोडफोड, भोसरीत पाच मोटारींची तोडफोड, देहूफाटा येथे पाच मोटारी व वीस दृुचाकींची तोडफोड, भिमा कोरेगाव प्रकरणानंतर पिंपरी, चिखली, निगडी, मोशी, पिंपरी, नेहरूनगर, भाटनगरमध्ये वीस वाहनांची तोडफोड, रामनगर, चिंचवडमध्ये सहा वाहनांची तोडफोड, मोहननगर, चिंचवड येथे पाच वाहने व चार दुकानांची तोडफोड, निगडी ओटास्किममध्ये सात वाहनांची तोडफोड झाली आहे. यासोबत प्रत्येक पोलिस ठाण्यात एक दोन वाहनांची तोडफोड, जाळपोळीच्या घडलेल्या घटना त्या वेगळ्याच आहेत.

शहरातील वाहनांच्या तोडफोडीच्या या घटना पाहता शहराची वाटचाल नक्की कोणत्या दिशेने चालू आहे याचा प्रत्यय येत आहे. किरकोळ भांडण झाले, परिसरात दहशत माजवायची असेल तर गुन्हेगार सर्वात प्रथम ‘टार्गेट’ रस्त्यावर उभा असणार्‍या वाहनांना करतात. सार्वजनिक ठिकाणी, सोसायट्याच्या पार्कींगमध्ये उभ्या असणार्‍या वाहनांची तोडफोड केली जात आहे. एकमेकांची खून्नस काढण्यासाठी घरांवर दगडफेक केली जात आहे. वाहनांची तोडफोड ही शहराला लागलेली एक प्रकारची किड असून ती पोलिसांनी मुळासकट काढणे गरजेचे आहे. निगडी, वाकड, सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाहनांची तोडफोडीचे प्रकार वारंवार घडताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांनी या परिसरातील गुन्हेगारांचा योग्य बंदोबस्त करण्याची गरज आहे. सध्या सुरु असलेले तोडफोडीचे सत्र पाहता गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक आहे की नाही असा प्रश्‍न पडतो आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होतो.

तोडफोड करणार्‍यांना पोलिसांकडून अटक केली जाते, मात्र अटक केली म्हणजे सर्वकाही सुरळीत झाले असे होत नाही. मुळात गुन्हेगारांची वाहनांची तोडफोड करण्याची हिंमतच कशी होते हे पोलिसांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. हद्दीमध्ये सामाजिक स्वास्थ बिघडवण्याचे काम करण्यापुर्वी अनेकदा गुन्हेगारांनी विचार करायला हवा अशी प्रतिमा पोलिसांची हवी. मात्र, सध्या घडणार्‍या घटनांवरुन तसे काही होताना दिसत नाही.


ठोस पुराव्यांची गरज...

परिसरात दहशत माजवून, स्वतःचे अस्तित्व निर्माण करणे, भीतीचे वातावरण निर्माण करणे, हाच उद्देश वाहनांची तोडफोड करण्यामागे असतो. त्यामुळे पोलिसांनी अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी न्यायालयात जास्तीत पुरावे सादर करणे गरजेचे आहे. तसेच, नागरिकांनीही सामाजिक भान लक्षात घेऊन साक्षीदार बनून पोलिस आणि न्यायालयास मदत करणे अपेक्षित आहे. पोलिस आणि नागरिकांनी साक्षीदार फितुर होणार नाही याची काळजी घेतल्यास नक्कीच गुन्हेगारांना कठोर शिक्षा होईल, असे मत अ‍ॅड. सुहास पडवळ यांनी व्यक्त केले.

Tags : Pimpri, pest, vehicles, taken, city