Sun, Jul 12, 2020 16:38होमपेज › Pune › शिष्यवृत्ती परीक्षेतील टक्का घसरला

शिष्यवृत्ती परीक्षेतील टक्का घसरला

Published On: Dec 15 2017 2:45AM | Last Updated: Dec 15 2017 1:31AM

बुकमार्क करा

पुणे  : गणेश खळदकर 

राज्यातील पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी तसेच पूर्व माध्यमिक इयत्ता आठवीच्या शिष्यवत्ती परीक्षा घेण्यासाठीच राज्य परीक्षा परिषद या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली होती. परंतु गेल्या चार ते पाच शिष्यवृत्ती परीक्षांचा आढावा घेतला तर शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांचा टक्का दरवर्षी मोठ्या प्रमाणात घसरत आहे. 

2013-14 साली विद्यार्थ्यांची असलेली संख्या ही जवळपास 15 लाख होती. ती 2017-18 मध्ये साडे 8 लाखांवर येवून ठेपली आहे. परीक्षा परिषदेच्या ढिसाळ नियोजनामुळे ही गळती वाढत असून एजन्सीच्या जीवावर होत असलेल्या कारभारामुळेच विद्यार्थ्यांचा टक्का घसरल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेवून त्यांना पुढील उच्च प्राथमिक  आणि माध्यमिक शिक्षणासाठी सहाय्य करणे तसेच विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धा परीक्षांचा पाया समजून सांगण्यासाठी सुरूवातीला इयत्ता चौथी तसेच इयत्ता सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जात असे. आता फक्त इयत्तांमध्ये वाढ करण्यात आली असून इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी ही परीक्षा घेण्यात येत आहे. शिष्यवृत्ती परीक्षेला 1954 साली सुरूवात करण्यात आली. 2009 साली आतापर्यंतचे सर्वात जास्त म्हणजे जवळपास 21 लाख विद्यार्थ्यांनी ही शिष्यवृत्ती परीक्षा दिली होती. मात्र गेल्या चार ते पाच परीक्षांचा आढावा घेतला तर या आकडेवारीत कमालीची घसरण झाल्याचे दिसून येत आहे.

सन 2013-14 साली इयत्ता चौथीसाठी 8 लाख 90 हजार 739 तर इयत्ता सातवीसाठी 6 लाख 78 हजार 786 अशा एकूण 15 लाख 69 हजार 525 विद्याथ्यार्र्ंनी परीक्षा दिली होती. 2014-15 साली इयत्ता चौथीसाठी 9 लाख 27 हजार 358 तर इयत्ता सातवीसाठी 6 लाख 66 हजार 931 अशा एकूण 15 लाख 94 हजार 289 विद्यार्थ्यानी परीक्षा दिली होती. 

सन 2015-16 साली ही परीक्षा झालीच नाही. तर 2016-17 साली परीक्षेच्या इयत्तेत बदल केल्याचे दिसून आले. त्यावेळी ही संख्या जवळपास 25 ते 30 टक्क्याने घटली आणि इयत्ता पाचवीसाठी 5 लाख 45 हजार 940 तर इयत्ता आठवीसाठी 4 लाख 3 हजार 359 अशा एकूण 9 लाख 49 हजार 299 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. आता 18 फेब्रुवारी 2018 रोजी ही शिष्यवृत्ती परीक्षा होत आहे. यासाठी इयत्ता पाचवीच्या 4 लाख 42 हजार 954 तर आठवीच्या 3 लाख 36 हजार 817 अशा एकूण 7 लाख 79 हजार 812 विद्यार्थ्यांनी पैसे भरून अर्ज पूर्ण केले आहेत.

तर जवळपास 46 हजार 906 विद्यार्थ्यांचे पैसे येणे बाकी आहेत. जरी या सर्व विद्यार्थ्यांचे पैसे भरून अर्ज पूर्ण करण्यात आले तरी एकूण संख्या ही 8 लाख 26 हजार 718 इतकीच राहणार आहे.त्यामुळे एकेकाळी 15 लाखांवर असलेली विद्यार्थीसंख्या आता 8 लाखांवर आली आहे. शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याची जबाबदारी राजकीय वरदहस्ताने नेमलेल्या एका एजन्सीला देण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यांना या परीक्षेसाठी प्रतीविद्यार्थी मिळणारा दर देखील जास्त आहे. आवेदन पत्र भरून घेण्यापासून ते निकाल काढेपर्यंतची सर्वच जबाबदारी या एजन्सीकडे आहे. परंतु राजकीय वरदहस्ताने नेमण्यात आल्यामुळे एजन्सी अधिकार्‍यांना देखील जुमानत नाही.