Sun, Apr 21, 2019 01:51होमपेज › Pune › लोहमार्ग पोलिसांच्या प्रसंगावधानतेमुळे वाचले प्रवाशाचे प्राण

लोहमार्ग पोलिसांच्या प्रसंगावधानतेमुळे वाचले प्रवाशाचे प्राण

Published On: Dec 26 2017 1:33AM | Last Updated: Dec 26 2017 12:39AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

पुणे रेल्वे स्थानकावर धावत्या लोकलमधून घाईघाईत उतरत असताना तोल गेल्याने लोकलमधून पडत असलेल्या महादेव येवले (50, बारामती)  या प्रवाशाचे लोहमार्ग पोलिसांनी दाखविलेल्या प्रसंगावधानतेमुळे प्राण  वाचले. पोलिस निरीक्षक मनोज खंडाळे आणि पोलिस कर्मचारी सचिन राठोड यांनी धावत प्रवाशाला बाहेर खेचत त्याचे प्राण वाचविले. ही घटना सोमवारी सकाळी पावणेअकराला फलाट क्रमांक एकवर घडली.

वैद्यकीय उपचार घ्यावयाचे असल्याने येवले सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास पुण्यात आले. उपचारांसाठी त्यांना पिंपरीला जायचे होते. त्यामुळे ते पुणे रेल्वे स्थानकावर आले होते. दरम्यान प्लॅटफार्म क्रमांक एकवर दौंडवरून आलेली डेमू लोकल उभी होती. त्या वेळी महादेव येवले यांना ही लोकल लोणावळ्याकडे जात आहे असे वाटल्याने ते लोकलमध्ये चढले. मात्र ही लोकल दौंडवरून येऊन यार्डात जात असल्याचे समजताच त्यांनी खाली उतरण्यासाठी प्रयत्न सुररू केला; मात्र तोवर लोकल सुरू झाली होती.

तिने वेगही घेतला होता. त्या वेळी लोकलमधून उतरताना त्यांचा पाय फलाटावर पडण्याऐवजी गाडी व फलाटाच्या मोकळ्या जागेत पडला आणि त्यांचा तोल गेला. ते खाली पडत असताना लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक मनोज खंडाळे आणि कर्मचारी सचिन राठोड फलाट क्रमांक एकवर पायी गस्त घालीत होते. तत्काळ येवले यांच्याकडे धाव घेतली. कर्मचारी राठोड यांच्या मदतीने येवले यांना बाहेर खेचत त्यांचे प्राण वाचविले. निरीक्षक खंडाळे व कर्मचारी राठोड या दोघांनी आपले प्राण वाचविल्यामुळे येवले यांनी त्यांचे आभार मानले.