Wed, Mar 20, 2019 23:36होमपेज › Pune › कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षांच्या आदेशाला ‘केराची टोपली’

कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षांच्या आदेशाला ‘केराची टोपली’

Published On: Mar 18 2018 1:06AM | Last Updated: Mar 17 2018 11:50PMपुणे : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे महासचिव म्हणून काम पाहणारे बाळासाहेब लांडगे यांच्याबाबत आणखीन एक तक्रार समोर आली आहे. परिषदेच्या बैठकांना जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून आपल्या ऐवजी संदीप आप्पा भोंडवे हे उपस्थित राहतील, असे लेखी पत्र परिषदेचे अध्यक्ष असलेले आणि पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधी असणारे शरद पवार यांनी दिले असतानाही, वस्तादांनी अध्यक्षांवरच ‘एकलंगी डाव’ टाकत त्यांच्या पत्राला ‘केराची टोपली’ दाखवली आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या आगामी काळात होणार्‍या बैठका आणि सर्वसाधारण सभांसाठी परिषदेचे अध्यक्ष शरद पवार हे व्यस्त कार्यक्रमांमुळे उपस्थित राहू शकणार नाहीत; त्यामुळे आगामी काळातील सर्व बैठकांना पुणे जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून, पुणे जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष संदीप भोंडवे हे उपस्थित राहतील, असे लेखी पत्र त्यांनी परिषदेचे महासचिव बाळासाहेब लांडगे यांना दिले आहे; परंतु या पत्राचा स्वीकार करण्यास महासचिवांनी विरोध दर्शविला असून, भोंडवे यांना बैठकील उपस्थित राहू दिले जाणार नाही, असे  सांगण्यात आले. तसेच परिषदेची कार्यकारिणी ही मोठी असते; अध्यक्ष नाही, अशी सूचनाही त्यांनी संबंधितांना केली असल्याचे समोर आले आहे. 

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेमध्ये अलीकडच्या काळात दुफळी निर्माण झाली असून, मनमानी कारभार सुरू असल्याची चर्चा सर्व कुस्तीपटूंमध्ये सुरू आहे. या कारभारामुळेच याच नावाची दुसरी कुस्तीगीर परिषद राज्यात स्थापन झाली असून, त्याला मान्यता मिळविण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यातच परिषदेचे महासचिव हे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचेही सचिव असल्याने आगामी काळात ‘वस्तादां’ना ही दोन्ही पदे गमवावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

पवारसाहेबांशी जे बोलायचे ते बोललो 

कार्यकारिणीची बैठक झाली आहे. पाठविलेल्या पत्राबाबत कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा केली आहे. त्याचबरोबर पवारसाहेबांसमवेत जे बोलायचे होते ते बोललेलो आहे, असे म्हणत परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी अधिक बोलण्यास नकार देत फोन कट केला.

अध्यक्षांचा मोठा अपमान 

जिल्हा कुस्तीगीर परिषदेच्या वतीने शरद पवार आणि ललित लांडगे हे प्रतिनिधी म्हणून परिषदेच्या बैठकांना उपस्थित राहत असतात. परंतु, नियमाबाह्य कामांमुळे ललित लांडगे यांचे प्रतिनिधित्व रद्द करण्यात आलेले आहे. आजच्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीला पुणे जिल्ह्याकडून एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. जिल्ह्यातील कुस्तीगीरांच्या समस्या मांडण्यासाठी शरद पवार यांच्या वतीने बैठकीस उपस्थित राहण्यासाठी माझी प्रतिनिधी म्हणून अध्यक्षांनीच नियुक्‍ती केली होती; परंतु परिषदेच्या महासचिवांनी अध्यक्षांच्या पत्राला केराची टोपली दाखवून, त्यांचा मोठा अपमान केला असल्याचे संदीप आप्पा भोंडवे यांनी व्यक्त केले.

 

Tags : pune, pune news,  maharashtra state wrestling council, President, order,