Mon, Jun 17, 2019 14:49होमपेज › Pune › औंधमध्ये रोबोटीक तंत्रज्ञानाचे शिक्षण घेण्याची संधी

औंधमध्ये रोबोटीक तंत्रज्ञानाचे शिक्षण घेण्याची संधी

Published On: May 27 2018 1:21AM | Last Updated: May 27 2018 12:34AMपुणे : प्रतिनिधी 

मेकॅट्रॉनिक्स आणि रोबोटीक तंत्रज्ञानाचे शिक्षण घेण्याची संधी औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) मिळणार आहे. या अल्प कालावधीच्या अभ्यासक्रमामुळे व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि रोबोटीक्स क्षेत्राशी निगडीत असणार्‍या औद्योगिक कंपन्यांमध्ये कर्मचार्‍यांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेता येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून पीएलसी, मेकॅट्रॉनिक्स आणि रोबाटीक्स तंत्रज्ञानाचे कोर्सेस राबविण्यात येणार आहेत. दरम्यान, देशात पहिल्यांदाच आयटीआयमध्ये अशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरू होणार असल्याचे आयटीआयच्या प्रशासनाने सांगितले.

आयटीआयच्या वतीने गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत प्राचार्य प्रकाश सायगावकर आणि विजय काळे यांनी माहिती दिली. विद्यार्थी आणि औद्योगिक कंपन्यांमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांना तंत्रज्ञानाचे उत्तम कौशल्य मिळावे म्हणून तीन अल्प कालावधीचे कोर्सेस सुरू करण्यात येत आहेत. पीएलसी, मेकॅट्रॉनिक्स आणि रोबाटीक्स तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्यासाठी आवश्यक त्या पूर्ण पायाभूत सुविधा आयटीआयने पूर्ण केल्या असून त्यासाठी नवे पीएलसी बोर्ड, मेकॅट्रॉनिक्स प्रणाली आणि दोन रोबोट्स बसविण्यात आले आहे. आयटीआयने तब्बल नव्वद लाख रुपये खर्च करून दोन रोबोट्स विकत घेतले आहे. या रोबोट्सची असेब्लिंग करणे सुरू असून येत्या काही दिवसात ते पूर्ण होईल, असे सायगावकर यांनी सांगितले.

हे तिन्ही कोर्सेस आयटीआयच्या शैक्षणिक संकुलात होणार आहेत. प्रत्येक कोर्ससाठी 18 विद्यार्थी अशी प्रवेशक्षमता ठेवण्यात आली आहे. साधारण 15 जूनपासून हे कोर्सेस सुरू होणार असून त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य, या तत्वावर प्रवेश देण्यात येणार आहेत. विद्यार्थी आणि पालकांना नाममात्र शुल्कात हे कोर्सेस शिकण्याची संधी मिळणार आहे. या कोर्सेसला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी औंध येथील आयटीआय कार्याल़याशी संपर्क किंवा 9604720343 या मोबाईल क्रमांकावर डि. व्ही. कुलकर्णी  यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन काळे यांनी केले आहे. दरम्यान, बाजारपेठेत उपलब्ध असणार्‍या नोकर्‍़या आणि संधींची माहिती आयटीआयमार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येईल. अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍याला आयटीआयमार्फत प्रमाणपत्र देण्यात येईल, असे सायगावकर यांनी सांगितले.