होमपेज › Pune › गणपती बाप्पांसमोर प्लास्टिकबंदीचे विघ्न

गणपती बाप्पांसमोर प्लास्टिकबंदीचे विघ्न

Published On: Jul 13 2018 12:50AM | Last Updated: Jul 13 2018 12:44AMपुणे : प्रतिनिधी

लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या दोन महिन्यांवर आल्याने मूर्तिकारांमध्ये गणेशमूर्ती बनविण्यासह त्यांच्या रंगकामाची लगबग वाढली आहे. राज्य सरकारकडून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडविण्याचे आवाहन होत असल्याने पर्यावरणस्नेही शाडूच्या गणेशमूर्ती तयार करण्याकडे मूर्तिकारांचा ओढा वाढला आहे. मात्र, राज्य सरकारने घेतलेल्या प्लास्टिकबंदीच्या निर्णयाचा फटका पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने शाडू मातीच्या गणेशमूर्ती घडविणार्‍या मूर्तिकारांना बसताना दिसत आहे. मूर्ती घडवत असताना त्या सुकण्यासाठी प्लास्टिकचे आच्छादन असणे आवश्यक आहे. मात्र, प्लास्टिकबंदीमुळे ते घालता येणार नसल्याने या मूर्ती सुकवायच्या कशा असा प्रश्‍न मूर्तिकारांपुढे उभा राहिला आहे. 

शहरासह उपनगरांमध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सार्वजनिक तसेच घरोघरी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत असल्याने गेल्या काही वर्षांत गणेशमूर्ती घडविणार्‍या कारखान्यांची संख्या वाढत आहे. सध्यस्थितीत शहर व परिसरात लहान मोठ्या स्वरुपात 100 ते 150 कारखाने अस्तित्वात आहेत. यामध्ये मुंढवा येथील केशवनगर, नवी पेठ, बिबवेवाडी, सेनादत्त पोलीस चौकी परिसर भागात गणेशमूर्ती घडविण्याचे काम करण्यात येते. दरम्यान, राज्य सरकारकडून लागू करण्यात आलेल्या प्लास्टिकबंदीचा फटका येथील मूर्तिकारांना बसत आहे. याबाबत बोलताना मूर्तिकार मयूर राजे म्हणाले, मूर्तीसाठी वापरण्यात येणार्‍या पिशव्या मूर्तींची वाहतूक केल्यानंतर भक्तांकडे सुपूर्त करण्यापूर्वी परत घेतल्या जातात. तसेच, त्या फेकून न देता त्याचा पुनर्वापर करण्यात येतो. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होईल, अशा पध्दतीने या प्लास्टिकचा वापर होत नाही.

दरम्यान, येथील गणेशमूर्ती या शहर, जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांत पाठविण्यात येतात. पावसाळ्यात मूर्तींची वाहतूक होत असल्याने प्लास्टिक हा महत्त्वपूर्ण घटक आहे. प्लास्टिकशिवाय गणेशमूर्तींची ने-आण करणे अवघड आहे. गेली 40 ते 45 वर्षे गणेश मूर्तींना प्लास्टिकचे आवरण घातले जाते. लहान प्लास्टिक बाजारात उपलब्ध होण्याआधी मोठ्या प्लास्टिकचा वापर केला जात होता. त्यामुळे मूर्तीचे आवरण म्हणून काम करणार्‍या प्लास्टिकला सूट देण्याचा विचार राज्य सरकारकडून व्हावा, अशी अपेक्षा मूर्तिकार अरुण गुजर यांनी व्यक्त केली. 

सद्यःस्थितीत शहरात मूर्तिकारांची मागण्या मांडण्यासाठी वेगळी अशी संघटना कार्यरत नाही. पण शहरात मोठ्या प्रमाणात मूर्ती तयार करण्यात येतात. त्याठिकाणी विविध संघटना अस्तित्वात आहेत. त्यांच्याकडून पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे प्लास्टिकला सूट देण्याचा विचार व्हावा या मागणीचे पत्र यापूर्वीच पाठविण्यात आले आहे. याखेरीज पाऊस असताना या मूर्ती प्लास्टिकशिवाय कशा घेऊन यायच्या, शाडूच्या मातीपासून बनलेल्या मूर्तीचे रक्षण करण्यासाठी कोणता पर्याय वापरायचा याबद्दल चर्चा करण्याची गरज असल्याचे मूर्तिकारांच्या वतीने सांगण्यात येत आहे.