Fri, Jul 19, 2019 07:36होमपेज › Pune › पुणे शहराचा पुढील खासदार राष्ट्रवादीचाच!

पुणे शहराचा पुढील खासदार राष्ट्रवादीचाच!

Published On: Apr 12 2018 1:19AM | Last Updated: Apr 12 2018 1:06AMपुणे : प्रतिनिधी

केंद्र आणि राज्य सरकार बेजबाबदार असून, यांनी सर्वसामान्यांना महागाईच्या खाईत लोटले आहे. सरकारच्या विरोधात जनमानसात मोठ्या प्रमाणावर रोष उमटत आहे. गेल्या निवडणुकीत पुणेकरांनी भाजपाला भरभरून साथ दिली होती. मात्र, केंद्र सरकारच्या चार वर्ष आणि राज्य सरकारच्या साडे तीन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पुण्याच्या हिताचा एकही प्रश्‍न सरकारला सोडवता आला नाही. त्यामुळे पुणेकरांनी आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्यावी. आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे लोकसभेची जागा लढवणार असून यापुढील खासदार राष्ट्रवादीचाच असेल, असा विश्‍वास राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. 

भाजपप्रणित केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यभरात हल्लाबोल आंदोलन सुरु आहे. या आंदोलनांतर्गत बुधवारी पुण्यातील वारजे येथे झालेल्या हल्लाबोल सभेत अजित पवार बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, शहराध्यक्षा खा. अ‍ॅड. वंदना चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांच्यासह शहरातील राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

आज पालकमंत्र्यांना शहर आणि जिल्ह्याचा समन्वय ठेवता येत नाही. बीडीपीची जागा कशी शिवसृष्टीला देऊ शकता. पुणेकरांना खोट बोलून का फसवता. भाजपचे खासदार, आमदार काय करत आहेत ? कोणालाच कळत नाही. भुसंपादन नसताना कात्रज कोंढवा रस्त्याचे टेंडर काढण्यात आले. पालिकेचे शिक्षण मंडळ बरखास्त केले. तरी अद्याप गेल्या वर्षभरात शिक्षण समितीची स्थापना केली नाही. पालिकेत सत्ता आल्यानंतर गेल्या वर्षभरात पाचशे ठेकेदारांची नोंदणी झाली आहे. हे सर्व ठेकेदार भाजपच्या नगरसेवकांचे नातेवाईक आहेत. त्यांच्याकडून कायदे पायदळी तुडवून दबाव टाकून कामे केली जात आहेत, असा घणाघात अजित पवार यांनी केला. 

सुनील तटकरे म्हणाले, भाजपाची निती खोटे बोल पण रेटून बोल, अशी आहे.  समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे आज मनुवादी सत्ताधारी करत आहेत. जयंत पाटील म्हणाले, निवडणुकीत दिलेली आश्वासने पंतप्रधान मोदींनी पाळली नाहीत.  चौकीदाराच्या काळात पैसे लाटून अनेकजण परदेशी गेले. हे लोक पळून जात असताना चौकीदार काय करत होते. 

वंदना चव्हाण म्हणाल्या, विकासाचे स्वप्न दाखवून आलेल्या केंद्र, राज्य आणि पालिकेतील सत्ताधार्‍यांनी लोकांचा भ्रमनिरास केला आहे. दीपक मानकर, नगरसेवक सचिन दोडके आणि काका चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.