Thu, Feb 21, 2019 21:19होमपेज › Pune › फेरीवाला कायद्याबाबत नवीन अध्यादेश काढावा

फेरीवाला कायद्याबाबत नवीन अध्यादेश काढावा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

महाराष्ट्रातील पथविक्रेत्यांसाठी सर्वसमावेशक एकच नियमावली योग्यरीत्या कालबद्ध राबवावी, यासाठी महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या  शिष्टमंडळाने नुकतीच नगरविकास, गृह (शहरे) व संसदीय कार्य राज्यमंत्री रणजित पाटील यांची भेट घेतली व नियमावलीसंदर्भात निवेदन दिले.  

निवेदनात असे नमूद केले आहे की, राज्य शासनाकडून राज्यातील सर्व नगरपालिका, महापालिका, व नगरपरिषदांना पथविक्रेता कायद्याबाबत नियमावली पाठवली होती; मात्र यात त्रुटी असून, संबंधित नियम मूळ कायद्यास अनुसरून नसून, ते फेरीवाला घटकास बाधा आणणारे आहेत. नॅशनल हॉकर्स फेडरेशन व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघासह फेरीवाला संघटनांनी  पुणे येथे राज्यस्तरीय बैठक घेऊन सविस्तर चर्चा करून  सुधारित प्रस्ताव दिला होता. या सुधारित प्रस्तावाची दखल घेऊन नवीन नियमावलीचा अध्यादेश देण्यात यावा, अशी मागणी महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते यांनी केली. 

या वेळी पाटील यांनी सदरचे निवेदन संबंधित  उपसचिवांकडे पाठवून यावर कायदेशीर आधार घेऊन लवकरच कार्यवाही करू, असे आश्वासन दिले.

मुंबई, नागपूरसह महाराष्ट्रात पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण झाले नसल्यामुळे पुढे कायदा अंमलबाजावणीस अनेक अडचणी येत होत्या. प्रत्येक शहरात वेगवेगळी परिस्थिती आहे, त्यासाठी योग्य नियोजन व्हावे. मुंबईची एल्फिनस्टन्स घटना घडल्यानंतर राज्यात काहूर झाले होते. सदर कायद्याच्या अमलबजावणीचे आदेश नुकतेच उच्च न्यायालयाने दिले आहेत.

उदरनिर्वाहाचे साधन म्हणून राज्यात विविध ठिकाणी विक्रेते व्यवसाय करत असून,  त्यांच्यावरील कारवाईऐवजी योग्य नियोजन करण्याबाबत राज्यस्तरीय बैठक घ्यावी, अशी मागणीही महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी केली. या वेळी उपाध्यक्ष साईनाथ खंडीझोड, उमेश डोर्ले, दिनेश कदम आदी उपस्थित होते.