Tue, Jun 18, 2019 20:19होमपेज › Pune › हॉटेल्सवरील कारवाईकडे पालिकेचे दुर्लक्ष

हॉटेल्सवरील कारवाईकडे पालिकेचे दुर्लक्ष

Published On: Mar 11 2018 1:02AM | Last Updated: Mar 11 2018 12:01AMपिंपरी : प्रतिनिधी 

अडीच महिन्यांपूर्वी मुंबईत एका हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत अनेक जणांचा मृत्यू झाला. या पार्श्‍वभूमकीवर  दक्षता म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिका शहरातील सर्व हॉटेलची तपासणी करून अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांवर कारवाई करणार होती; मात्र अद्याप एकाही हॉटेलवर प्रशासनाने कारवाई केलेली नाही. ‘अर्थपूर्ण’ संबंधांमुळेच जाणीवपूर्वक अशा हॉटेलवर कारवाई केली जात नसल्याची धक्कादायक बाब आहे.    

शहरात मोठ्या संख्येने शाकाहारी, मांसाहारी हॉटेल्स, रेस्टारंट  व  बार आहेत.  त्याचबरोबर खाद्यपदार्थ विक्रीचे शेकडो स्टॉल व टपर्‍या आहेत. या सर्व हॉटेल्स व खाद्यपदार्थ स्टॉलची तपासणी करण्याचे धोरण पालिका प्रशासनाने निश्‍चित केले होते. यासाठी पालिकेचे अग्निशामक दल, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग आणि इतर विभागांचे एक स्वतंत्र पथक बनविण्यात येणार होते. या पथकाद्वारे अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण केलेल्या हॉटेलवर कारवाईचे नियोजन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशावरून करण्यात आले होते.

शहरातील सर्व हॉटेल्सची तपासणी करून अहवाल करण्याचे काम पूर्ण करण्यात आल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. मात्र, कारवाई अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. शहरात शेकडो हॉटेल्स आहेत. वाहनतळाच्या जागेत वाढीव बांधकाम करून अनेक हॉटेलनी अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केले आहे. त्याच पद्धतीने गच्चीवर अनधिकृत बांधकामे करून हॉटेल उभारली आहेत. अशी अनेक हॉटेल वाकड, निगडी, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, भोसरी, आकुर्डी, पिंपळे निलख, पिंपरी, कासारवाडी, थेरगाव परिसरात आहेत; तसेच विनापरवाना रस्त्यावर वाहनतळ उभारले आहेत. अशा हॉटेलवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह शहरातील विविध सामाजिक संघटनांनी पालिकेकडे केली होती. मात्र, हॉटेल व्यावसायिकांसोबत असलेल्या ‘अर्थपूर्ण’ संबंधामुळे त्याकडे पालिकेचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.  

दोन महिने उलटूनही ठोस कारवाई नाही

मुंबईतील लोअर परळ भागातील कमला मिल येथील हॉटेलच्या टेरेसला (रूफ टॉप) आगीची दुर्दैवी घटना गेल्या वर्षी डिसेंबरच्या अखेरीस घडली होती. त्यात 15 जणांचा जीव गेला होता. त्यातून धडा घेऊन शहरातील हॉटेलबाबत दक्षता घेऊन सुरक्षा पुरविण्याबाबत पालिकेने धोरण आखले होते. त्यास दोन महिने उलटूनही सुरक्षेच्या दृष्टीने अद्याप एकाही हॉटेलवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे शहरातही मुंबईसारखी आगीची घटना घडावी, या प्रतीक्षेत पालिका प्रशासन असल्याचे स्पष्ट होत आहे.