Wed, Aug 21, 2019 02:42होमपेज › Pune › गरजू रुग्णांना मिळणार मोफत रक्‍त

गरजू रुग्णांना मिळणार मोफत रक्‍त

Published On: Feb 22 2018 1:24AM | Last Updated: Feb 21 2018 11:51PMपिंपरी : प्रतिनिधी

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गोरगरीब, गरजू रुग्णांना रक्‍तपेढीतून मोफत रक्‍त देण्यात यावे, असे आदेश आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत. त्यामुळे ब्लड बँकेत रक्‍त आणण्यासाठी गेलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना मोफत रक्‍त द्यावे लागणार आहे; मात्र याबाबत अद्याप महापालिकेला कोणताच अध्यादेश प्राप्‍त झाला नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाकडून महापालिकास्तरावर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्यानुसार विविध आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांना मोफत औषधोपचार करण्यात येतो;  तसेच घरोघरी आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, याकरिता आशा स्वयंसेवींची नेमणूकही केलेली आहे. त्याच अभियानांतर्गत रुग्णालयात लाखो रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येतात. 

शस्त्रक्रियेप्रसंगी अनेक रुग्णांना रक्‍ताची आवश्यकता असते. रक्‍तदान करण्यास चालना मिळावी; तसेच रक्‍त रुग्णांना मोफत दिल्यास रक्‍तदान करण्याची चळवळ निर्माण होऊन रक्‍तदात्यांची संख्या वाढण्यास मदत होईल, या उद्देशाने केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांना आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सर्व रक्‍तपेढी किंवा ब्लड बँकांमध्ये रक्‍त आणण्यास गेलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांकडून कोणतीही फी घेतली जाणार नाही, असे आदेशात नमूद केल्याने गोरगरिबांना त्याचा फायदा होणार आहे.  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे ब्लड बँक सुरू करण्यात आली आहे. पूर्वी तालेरा येथे ही ब्लड बँक होती. या ब्लड बँकेतून अनेक रुग्ण रक्‍त पिशवी घेऊन जात आहेत. 

राज्य शासनाकडून गरजूंना मोफत रक्‍त पिशव्या देण्यासाठी अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्यास शहरातील गोरगरीब रुग्णांना याचा फायदा होणार आहे; मात्र अद्याप तसा कोणताच अध्यादेश आला नसल्याचे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे सध्या तरी रुग्णांना त्याचा फायदा होणार नसल्याचे चित्र आहे.