Fri, Apr 26, 2019 17:22होमपेज › Pune › नृत्य कलावंतांसाठी नृत्यगृहाची गरज

नृत्य कलावंतांसाठी नृत्यगृहाची गरज

Published On: Feb 20 2018 1:55AM | Last Updated: Feb 20 2018 12:06AMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर 

कालानुरूप नृत्य प्रकार वाढले आहेत. शास्त्रीय, उपशास्त्रीय, लोकनृत्य प्रकाराबरोबरच वेस्टर्न नृत्य प्रकाराकडे तरुणाईचा ओढा वाढत आहे; मात्र दुसरीकडे नृत्य कलावंतांना नाट्यगृहे उपलब्ध होत नाहीत, मिळाली तरी नृत्य कलावंत, मुझिशियन यांना तेथे योग्य त्या सुविधा उपलब्ध होत नसल्याने आता पालिकेने स्वतंत्र नृत्यगृहाची निर्मिती करावी, अशी मागणी होत आहे. 

भारतात भरतनाट्यम, कथक, कथकली, मणिपुरी, कुचिपुडी, मोहिनी अट्टम, ओडिसी, सेत्रीय (आसाम) असे शास्त्रीय नृत्याचे आठ प्रकार आहेत. लोकनृत्याचे अडीचशेहून अधिक प्रकार आहेत. यांपैकी एकट्या महाराष्ट्रात 35 हून अधिक लोकनृत्य प्रकार आहेत. प्रत्येक नृत्य हा अभ्यासाचा विषय आहे. यातील गायन, वादन, साहित्यप्रकार एकमेकांशी जोडलेला असतो. नृत्य हे एक आनंददायी सादरीकरण असते; मात्र नृत्याचे प्रकार वाढत असताना कलावंतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

एक तर नृत्याच्या कार्यक्रमासाठी नाट्यगृहे मिळत नाहीत आणि मिळाली तरी नृत्य कलावंत, मुझिशियन यांना आवश्यक त्या सुविधा तेथे उपलब्ध होत नाहीत. लाईव्ह मुझिशियन नृत्याबरोबर गातात तेव्हा तेवढी जागा उपलब्ध नसते. विविध नृत्य प्रकारासाठी स्क्रीनची; तसेच लेव्हल, बेसिक चौकट, विंगेतून प्रकाशयोजना याची गरज असते. या सुविधा नृत्यगृह झाल्यास तेथे उपलब्ध होऊ शकतात. चेन्नई येथे संगीत नृत्य महोत्सव होतो. तेथे संगीत संमेलनात संगीतावर परिसंवाद होतात,  विचारांची देवाणघेवाण होते, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने असा उपक्रम व्हावा; तसेच निळू फुले नाट्यगृह, प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, अंकुशराव लांडगे नाट्यगृह, याबरोबरच पालिकेने आता नृत्यगृह उभारावे, अशी मागणी नृत्य कलावंत करत आहेत. 

यासंदर्भात 8 हजारांहून अधिक नृत्य कलावंत घडविलेल्या नृत्य कलामंदिर संस्थेच्या नृत्यगुरू तेजश्री अडिगे म्हणाल्या की, नृत्य कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. नाट्यगृह मिळत नाहीत, कार्यक्रम आयोजित करणारे मानधन देताना फसवतात,  पैसे मिळत नाहीत, कार्यक्रम रद्द होतो तेव्हा त्यावर केलेला सराव, मेहनत वाया जाते. नृत्य कोरिओग्राफर वाटेल तेवढे पैसे मागतात. हे सारे प्रश्न मार्गी लावणे व नृत्य कलाकारांना जगभर व्यासपीठ मिळावे यासाठी पुण्यात 2016 साली नृत्य परिषदेची स्थापना झाली. पालकमंत्री गिरीश बापट हे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, तर मनीषा साठे या कार्याध्यक्ष आहेत.

संस्थेची पिंपरी-चिंचवडला विभागीय शाखा असावी याबाबत माझ्या निवासस्थानी काही दिवसांपूर्वी बैठक झाली. या बैठकीत नृत्य कलावंतांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. आज जो तो उठतो आणि नृत्य प्रशिक्षण संस्था काढतो, नृत्य प्रशिक्षण संस्था स्थापन केलेल्या व्यक्तीचे प्रशिक्षण झाले आहे. काय हे पाहणे इथपासून ते नृत्य कलावंतांना येणार्‍या अडचणी मार्गी लावणे यासाठी नृत्य परिषद कार्यरत राहणार आहे.

अ‍ॅम्फी थिएटरची गरज 

पिंपरी-चिंचवड शहरात अनेक मोकळ्या जागा आहेत. यातील योग्य त्या ठिकाणी महापालिकेने अ‍ॅम्फी थिएटर उभारल्यास कलावंतांना सुविधा उपलब्ध होऊ शकतील.  - तेजश्री अडिगे (नृत्य गुरू)