Thu, Jun 27, 2019 15:54होमपेज › Pune › दुभंगलेल्या आरपीआयला ‘नवसंजीवनी’ची गरज 

दुभंगलेल्या आरपीआयला ‘नवसंजीवनी’ची गरज 

Published On: Jul 14 2018 12:56AM | Last Updated: Jul 14 2018 12:16AMपुणे : शिवाजी शिंदे

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची शहरातील अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अगोदरच ठराविक कार्यकर्ते असलेल्या या पक्षाच्या शहराध्यपदाच्या निवडणुकीवरून पदाधिकार्‍यांमध्ये चांगलेच ‘रणकंदन’ माजले आहे. एकोप्याऐवजी दोन गट पडले असून, दोन शहराध्यक्ष कार्यरत झाले आहेत. एक निवडून आलेले, तर दुसरे वेगळ्या गटाने घोषित केलेले. या दोन गटांच्या द्वंद्वात पक्षाचे विचार आणि असलेले आचार कोणत्या दिशेला जाणार आहेत, हे सध्या तरी दिसून येणे अवघड झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची कास धरून मागील काही वर्षांपासून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कार्यकर्ते तसेच पदाधिकार्‍यांनी पक्षाची चांगली मोट बांधली होती. प्रश्‍न राजकीय असो की, सामाजिक अगर सर्वसामान्य नागरिकांचे. प्रत्येक प्रश्‍नावर आंदोलन उभे करून प्रशासन आणि अन्याय करणार्‍यांना जेरीस आणण्यात या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकार्‍यांचा हातखंडा आहे.

तळागाळातील नागरिकांचे प्रश्‍न हिरिरीने मांडण्यात या पक्षाचे कार्यकर्ते कायमच आघाडीवर असतात. विचारांची ठराविक बैठक असल्याशिवाय कोणत्याही राजकीय पक्षाला प्रगती करता येत नाही. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पक्षास विचारांची प्रणाली दिली आहे. मात्र, सध्या या पक्षाची शहरातील अवस्था अत्यंत बिकट झाली असल्याचे चित्र दिसून आले आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यामध्ये संवाद नाही. एकाच वेळी अनेक आघाड्या. प्रत्येक आघाडीचा वेगळा नेता. यामुळे विचार एक असले तरी प्रत्येकाने वेगळी चूल मांडली. याचा परिणाम पक्षाचा शहराध्यक्ष निवडीवर झाला. खरे तर या पक्षामध्ये पहिल्यांदाच शहराध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये अशोक कांबळे विजयी झाले. ही निवडणूक लोकशाही पध्दतीने झाली. मात्र, दुसर्‍या गटाने या निवडणुकीमध्ये राजकारण झाले असल्याचा आरोप केला आहे. निवडून आलेले शहाराध्यक्ष मान्य नसल्याचे जाहीर करून दुसर्‍या गटाने अशोक शिरोळे यांना शहराध्यक्ष घोषित केले. एकाच पक्षाच्या दोन शहराध्यक्षांमुळे या पक्षातील राजकीय वातावरण तापले आहे. पक्षाचा कोणताही पदाधिकारी एकमेकांचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. यामुळे पक्षाची विचारधारा खालावली आहे, की काय असे म्हणण्याची वेळ आली आहे.

आरपीआयमध्ये शहरात पडलेल्या दोन गटांमुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम तयार झाला आहे. कोणत्या पदाधिकार्‍याकडे आपण जायचे याबाबत मोठे कोडेच त्यांच्यापुढे आहे. विचार एक... मात्र, त्यामध्ये दुही असे वातावरण सध्या तरी या पक्षात आहे. खरे तर विचारांची कास असलेल्या या पक्षामधील कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांना पुन्हा एकदा ‘नवसंजीवनी’ देण्याची गरज निर्माण झाली आहे, तरच पक्षामध्ये आलेली मरगळ झटकण्यास सहकार्य मिळेल असे वाटतेे.