Fri, Feb 22, 2019 15:38होमपेज › Pune › ‘रेल्वे कुली’ नाव होणार इतिहासजमा

‘रेल्वे कुली’ नाव होणार इतिहासजमा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : निमिष गोखले 

रेल्वे कुली हे नाव आता इतिहासजमा होणार असून, सहायक (लगेज असिस्टंट) या नव्या नावाने ते लवकरच ओळखले जातील. कुली या शब्दाचा अर्थ मजूर असा होत असून, त्यांच्यावर हा अन्याय आहे. ते कष्टकरी असून, पोटासाठी मेहनत करत प्रवाशांचे सामान एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी खांद्यावर उचलून नेण्याचे काम करीत असतात. त्यामुळे त्यांना मजुराची व्याख्या लागू होत नाही. त्यांनाही इतरांसारखा मानसन्मान मिळावा, हा नाव बदलण्यामागील हेतू आहे, अशी माहिती रेल्वे सूत्रांकडून देण्यात आली. 

ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना कुलींना सहायक म्हणून संबोधले जावे, असा प्रस्ताव रेल्वे बोर्डाने सादर केला होता. या निर्णयाला मंजुरीदेखील मिळाली; मात्र काही कारणाने त्याची अंमलबजावणी त्यावेळी होऊ शकली नाही. सुरेश प्रभू रेल्वेमंत्री असताना त्याचा पुन्हा एकदा नामोल्लेख झाला. मात्र, त्याही वेळी निर्णयाची अंमलबजावणी झालीच नाही. आता मात्र त्याची अंमलबजावणी दृष्टिपथात असून, एप्रिल महिन्यात कुलींना प्रतिष्ठेचे ‘सहायक’ असे नाव देण्यात येणार आहे. दरम्यान, वर्षानुवर्षे लाल रंगाचा गणवेश परिधान केलेल्या कुलींच्या गणवेशाचा रंगही आता बदलणार असून, तपकिरी किंवा फिकट निळ्या रंगाचा नवा गणवेश त्यांना मिळणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे. 

पुणे रेल्वे स्टेशनवर सद्य:स्थितीत 160 कुली असून, 40 ट्रॉल्या आहेत. मात्र, प्लॅटफॉर्म सातवर मोडलेल्या ट्रॉल्या विखुरलेल्या अवस्थेत दिसतात. त्यांची चाके, नट-बोल्ट उपलब्ध होत नसून, नव्या ट्रॉल्या तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी काही कुलींनी केली आहे. दरम्यान, रेल्वे बोर्डाने नव्या ट्रॉल्या लवकरच उपलब्ध करून देऊ, असे आश्‍वासन दिले आहे. ज्या ठिकाणी लिफ्ट, सरकते जिने (एस्कलेटर) नाहीत, अशा ठिकाणी ट्रॉल्यांचा चांगला उपयोग होत असल्याने त्या सुस्थितीत असणे गरजेचे आहे, असे मत रेल्वे तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

Tags : Pune, Pune News, name,  train, kuli, history


  •