Thu, Aug 22, 2019 08:58होमपेज › Pune › सुपारी फक्‍त पत्नीला मारण्याचीच ; बाळाला मारायचे ठरलेले नव्हते 

सुपारी फक्‍त पत्नीला मारण्याचीच ; बाळाला मारायचे ठरलेले नव्हते 

Published On: Jun 21 2018 1:21AM | Last Updated: Jun 21 2018 12:55AMपिंपरी : संतोष शिंदे

विवाहबाह्य संबंधात अडसर ठरत असल्याने एका नराधमाने स्वतःची  पत्नी व आठ महिन्यांच्या बाळाचा सुपारी देऊन खून केल्याची धक्कादायक घटना नुकतीच हिंजवडी परिसरात घडली. सुपारी घेतलेल्या तीनही आरोपींनी आपण फक्त पत्नीला मारण्याची सुपारी घेतली होती, त्या बाळाला मारण्याचे आमच्या ‘प्लॅन’मध्ये नव्हतेच असा धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे बाळाचा गळा घोटणारे हात बापाचेच असण्याची दाट शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

अश्विनी भोंडवे व अनुज भोंडवे या मायलेकरांचा गळा दाबून खून करण्यात आला होता. या हत्येप्रकरणी अश्विनीचा पती दत्ता वसंत भोंडवे, त्याची प्रेयसी सोनाली बाळासाहेब जावळे, प्रशांत जगन भोर, पवन नारायण जाधव आणि सावन नारायण जाधव यांना अटक करण्यात आली होती.

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी पती दत्ता भोंडवेने सुरुवातीला लुटमारीचा बनाव केला  होता; मात्र या प्रकरणात पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे 12 तासांच्या आत त्यांच्या ‘प्लॅन’चा फज्जा उडाला. पुढील चौकशीत दत्तानेच पत्नी व बाळाची हत्या करण्यासाठी तिघांना दोन लाखांची सुपारी दिल्याची माहिती समोर आली. सुपारी घेतलेल्या आरोपींकडे चौकशी करताना ही सुपारी फक्त पत्नीची हत्या करण्यासाठी घेतल्याची कबुली दिली. आम्ही त्या बाळाला मारले नसल्याचे आरोपींकडून सांगण्यात आले.

घटनेच्या दिवशी दत्ता पूर्वनियोजित कटानुसार रात्री आठच्या सुमारास अश्विनीला नेण्यास डांगे चौकात आला होता. पुनावळे येथे गेल्यावर दत्ताने उलट्याचे नाटक करीत गाडी थांबवली. तो चूळ भरण्यासाठी खाली उतरला असता प्रशांत भोर आणि पवन जाधव दोघेजण त्याच्या कारमध्ये येऊन बसले व त्यांनी दत्ताला चाकूचा धाक दाखवून कार नेरे जांबे रस्त्यावर नेण्यास सांगितले. दत्ताने कार नेरे जांबे रस्त्यावरील निर्मनुष्य ठिकाणी आणली. त्याठिकाणी आरोपींनी  दोरीने गळा आवळून अश्‍विनीचा खून केला; परंतु यावेळी अनुज मागच्या सीटवर झोपला होता. 

अश्विनी मृत पावल्याची खात्री झाल्यानंतर दत्ता पुन्हा आरोपींना सोडण्यासाठी पुनावळे येथे आला होता. त्यावेळी अश्विनीचा मृतदेह देखील गाडीतच होता. आरोपींना पुनावळेत सोडेपर्यंत अनुज जिवंत होता. आम्हाला पुनावळेत सोडल्यानंतर दत्तानेच पुन्हा त्याच ठिकाणी जाऊन अनुजचा गळा दाबला असल्याचा दावा आरोपींकडून केला जात आहे. दत्ताच्या या क्रूर कृत्यामुळे पोलिसदेखील अवाक् झाले आहेत.

‘त्या’ बाळाचा गळा घोटणारे हात कुणाचे?

आमची सुपारी फक्त पत्नीला संपवण्याची होती. त्यामुळे आम्ही बाळाला मारले नाही, अशी कबुली आरोपींनी पोलिसांजवळ दिली आहे. दत्ताकडे चौकशी करताना ‘मी पोटच्या मुलाचा गळा कसा आवळू शकतो’ असे भावनिक नाटक करून बाळास मारल्याचे नाकारले आहे. त्यामुळे ‘त्या’ बाळाचा गळा घोटणारे हात नेमके कुणाचे हे न्यायालयात सिद्ध करणे महत्वाचे ठरणार आहे.