पिंपरी : प्रतिनिधी
मित्रांकडून हातउसणे घेतलेेले पैसे परत करण्यासाठी ओळखीच्या व्यापार्याने दोन लाख रुपये देण्यास नकार दिल्याने तरुणाने गळा आवळून साबण व्यापार्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. खून करणार्यास पिंपरी पोलिसांनी सोलापूर येथून अटक केली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली.सचिन यशोदास भालेराव (33, रा. लिमयेवाडी, सोलापूर) याला अटक केली आहे. अटक केलेल्या सचिन याला न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी 14 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावलेली आहे. तर प्रदीप ऊर्फ बाबू विरुमन इंगोरानी या व्यापार्याचा खून झालेला आहे. प्रदीप हे पिंपरीमधील साबणाचे होलसेल व्यापारी होते. त्यांच्या घरी त्यांची आई आणि ते असे दोघेच राहत. बुधवारी (दि. 2 मे) सकाळी सातच्या सुमारास घरकाम करणारी मोलकरीण घरी आली. त्यावेळी प्रदीप यांचा खून झाल्याचे उघडकीस आले. तर प्रदीप यांच्या आई घरातील समोरच्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळल्या.
मोलकरणीने याबाबत माहिती शेजारील नागरिकांना दिली. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तपास सुरू झाला. घटनास्थळी पोलिसांना काहीच आढळून आले नाही. त्यामुळे तपास करताना अडचणी येत होत्या. त्यामुळे पोलिसांनी कसून तपास सुरू केला. दरम्यान, पिंपरी परिसरातील नागरिकांकडून काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. त्यानुसार पोलिसांनी परिसरातील आणि रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली. त्यावरून सचिन याला सोलापूर येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली.
सचिन आणि प्रदीप हे ओळखीचे होते. काही महिन्यांपूर्वी एकाने दोघांची ओळख केली होती. सचिनची पत्नी वडगाव मावळमधील एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करते. तिला सरकारी नोकरी लावण्यासाठी दोन लाख रुपयांची आवश्यकता होती. त्यासाठी सचिनने सोलापूर येथील मित्रांकडून पैसे हातउसणे घेतले होते. तो मित्र पैशासाठी नेहमी तगादा लावत होता. म्हणून सचिनने ओळखीचे साबण व्यापारी प्रदीप यांच्याकडे पैशांची मागणी केली. प्रदीप यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्या रागातून सचिनने टॉवेल गळ्याला आवळून प्रदीप यांचा खून केला. तसेच त्यांच्या आईला मारहाण केली आणि कपाटातील 38 हजार रुपये घेऊन पलायन केले. ही कामगिरी सहायक आयुक्त सतीश पाटील, वरिष्ठ निरीक्षक श्रीधर जाधव, मसाजी काळे, सहायक निरीक्षक रामदास मुंढे, उपनिरीक्षक बाळासाहेब अंतरकर, विठ्ठल बढे, सागर पाटील, कर्मचारी प्रभाकर खणसे, थेऊरकर, शाकीर जिनेडी, महादेव जावळे, नीलेश भागवत, नितीन सूर्यवंशी, जावेद पठाण, राजेंद्र भोसले आणि त्यांच्या पथकाने केली. तपास पिंपरी पोलिस करत आहेत.
मदत करणार्यांचा सत्कार
साबण व्यापार्याचा खून प्रकरणात पोलिसांना तपासात मदत करणारे रोमी सिंधू, करण कुमार आणि पवन माने यांचा पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच नागरिकांनी अशाच प्रकारे पोलिसांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले.