Mon, Aug 19, 2019 07:32होमपेज › Pune › प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या

प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या

Published On: Mar 15 2018 1:20AM | Last Updated: Mar 15 2018 12:46AMलोणावळा : वार्ताहर 

आपल्या प्रेयसीला फिरायला घेऊन गेल्याचा राग मनात धरून एका महाविद्यालयीन युवकाला जिवे मारून त्याचा मृतदेह पाण्यात टाकून दिल्याची खळबळजनक घटना लोणावळा शहरातील तुंगार्ली धरणावर घडली. मृत युवकाचे नाव किसन शिवा परदेशी (20, रा.भैरवनाथ नगर, कुसगाव, ता.मावळ) असे आहे. मंगळवारी सायंकाळी सव्वाचारच्या पूर्वी सदर घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी मृत युवकाचा चुलता भरत मिठाईलाल परदेशी (53, रा.भैरवनाथ नगर, कुसगाव, ता.मावळ) याने फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे मंगळवारी चार वाजण्याच्या सुमारास किसन परदेशी हा एका मुलीला घेऊन तुंगार्ली धरणावर फिरायला गेला होता. ही माहिती समजल्यावर या प्रकरणातील आरोपी प्रशांत विठ्ठल धरफळे (रा.डोंगरगाव वाडी, ता.मावळ) हा मनात राग धरून घटनास्थळी पोचला. त्याने त्याठिकाणी किसन परदेशी याला हाताने आणि दगडाने मारहाण करीत त्याचा खून केला आणि त्यानंतर त्याचा मृतदेह धरणाच्या पाण्यात टाकला. किसन याचा मृतदेह बुधवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास शिवदुर्ग मित्र संस्थेच्या बचाव पथकाने पाण्यातून बाहेर काढला.

लोणावळा शहर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आरोपी प्रशांत धरफळे याला ताब्यात घेतले आहे.  याप्रकरणी पुढील तपास स.पो.नि. एन.बी.रानगट हे करीत आहे.