Thu, Apr 18, 2019 16:08होमपेज › Pune › दावडीत धावत्या बसमध्ये तरुणाची हत्या

दावडीत धावत्या बसमध्ये तरुणाची हत्या

Published On: Jun 13 2018 1:34AM | Last Updated: Jun 13 2018 12:41AMनिमगाव दावडी :  वार्ताहर 

गोलेगाव ते राजगुरुनगर या धावत्या एसटी बसमध्ये मंगळवारी (दि. 12) सकाळी साडेसातच्या दरम्यान खेसे वस्ती (दावडी, ता. खेड) येथे अजित भगवान कान्हुरकर याने श्रीनाथ सुदाम खेसे (वय 18) याची कोयत्याने डोक्यावर, मानेवर वार करून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे एसटी बसमधील प्रवासी भयभीत झाले होते. हत्या केल्यानंतर अजित कान्हुरकर फरार झाला. 

एसटीचालक, वाहक यांनी राजगुरुनगर येथील खासगी दवाखान्यात श्रीनाथ याला आणले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, येथील नागरिक मोठ्या संख्येने खेड पोलिस ठाण्यात जमले व आरोपीला तत्काळ अटक करा, तरच येथून मृतदेह ताब्यात घेऊ असे सांगितले. त्यामुळे पोलिस ठाण्यासमोर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

आरोपी अजित कान्हुरकर याने मयत तरुणाच्या बहिणीला तू माझ्याशी लग्न कर, या कारणावरून तिचे अश्‍लील फोटो फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपवर दि. 7 मे 2018 रोजी पाठविले. अनेकदा धमक्या दिल्या, तुमच्या मुलीचे माझ्याशी लग्न लावून दिले नाही तर मी जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. यामुळे दि. 8 जून 2018 रोजी शिवाजी खेसे, सुदाम खेसे व मुलगी यांनी खेड पोलिस ठाण्यात येऊन अजित भगवान कान्हुरकर याच्या विरुद्ध फिर्याद दिली होती. परंतु, खेड पोलिस स्टेशनचे ठाणे अंमलदार डी. वाय. सावंत व बीट अंमलदार ए. डी. उबाळे यांनी तक्रारदार यांची कोणतीही दखल घेतली नाही.

दि. 12 रोजी सकाळी सात वाजता श्रीनाथ सुदाम खेसे (वय 18) व त्याची बहीण खेडला जाण्यासाठी खेसे वस्ती बसथांब्यावर थांबले. सकाळी 7.20 वाजता मुक्कामी गोलेगाव-राजगुरुनगर बस खेसे बसस्टॉपवर आल्यावर दोघेही बसमध्ये बसले. बस 1 किलोमीटर अंतरावर गेल्यावर जगदंबा मका भरडा केंद्र येथे बस थांबली होती. आरोपी अजित भगवान कान्हुरकर अगोदरच बसमध्ये श्रीनाथ याच्या पाठीमागील सीटवर बसलेला  होता.  एसटी बस चालू असताना आरोपीने उठून पिशवीतून लोखंडी कोयता काढून   श्रीनाथ याच्या डोक्यावर व मानेवर सपासप वार केले. आरोपी पळून जात असताना इतर प्रवाशांनी पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो इतर प्रवाशांवर कोयता घेऊन धावला. श्रीनाथ हा रक्तबंबाळ अवस्थेत बसमध्ये पडला. एसटीचालक व वाहक यांनी श्रीनाथ याला राजगुरुनगर येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृतदेह खेड पोलिस स्टेशनला आणण्यात आल्यावर नातेवाईक व ग्रामस्थांनी  पोलिसांच्या भोंगळ कारभाराविषयी जोरदार घोषणा देण्यात आल्या. या वेळी जमावाला शांत करण्याचे काम खेड उपविभागीय अधिकारी राम पठारे व इतर अधिकारी यांनी केले. पोलिस स्टेशनसमोर तीन तास नातेवाईक यांनी ठिय्या मांडला होता.