Mon, Mar 25, 2019 09:37होमपेज › Pune › रहाटणीमध्ये गोळीबार करून व्यावसायिकाचा खून 

रहाटणीमध्ये गोळीबार करून व्यावसायिकाचा खून 

Published On: Jul 24 2018 1:44AM | Last Updated: Jul 24 2018 11:16PMपिंपरी : प्रतिनिधी 

दुचाकीवर पाठलाग करत आलेल्या चोरट्यांनी एका व्यावसायिकाचा गोळ्या घालून खून केला. त्याच्याकडील दोन लाखांची रोकड असलेली बॅग लंपास केली. ही घटना रहाटणीतील प्रभात कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर सोमवारी (दि. 23) रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली.  अनिल रघुनाथ धोत्रे (44,रा.प्रभात कॉलनी, रहाटणी) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव असून त्यांचे बंधू राजकुमार रघुनाथ धोत्रे (वय 50) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजण यांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल यांचे काळेवाडी येथील पाचपीर चौकात ज्योती टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाने ऑफिस आहे. याच ऑफिसमध्ये त्यांचा मनी ट्रान्सफरचा व्यवसाय आहे. नेहमीप्रमाणे ऑफिसचे काम उरकून घरी येत असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला  केला. अनिल रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्याकडील 1 लाख 96 हजारांची रोकड असलेली बॅग हिसकावून  पोबारा केला. 

अनिल अगदी घराच्या कोपर्‍यापर्यंत आले असताना चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. गोळीबाराच्या आवाजाने त्यांचा भाऊ राजकुमार धावत त्या ठिकाणी आला. त्यावेळी अनिल  रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. राजकुमार यांनी एका भाडेकरूच्या मदतीने अनिल यांना थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात दाखल केले.मात्र, त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. ज्या ठिकाणी चोरट्यांनी गोळीबार केला त्या ठिकाणापासून अवघ्या दोनशे फूट अंतरावर गेल्याच आठवड्यात एका बस चालकाच्या डोक्यात सिमेंटचे गट्टू घालू खून करण्यात आला आहे . या घटनेतील आरोपींचा अद्याप मागमूस लागला नाही. लागोपाठ खुनाच्या दोन घटना घडल्याने रहाटणी परिसरात भीतीचे वातावरण आहे. पुढील तपास वाकड पोलिस करीत आहेत.

चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली आहे. एका दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले आहेत. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले असून त्यावरून तपास सुरू आहे. आरोपींच्या शोधात पथके रवाना करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.