Sun, Nov 18, 2018 20:12



होमपेज › Pune › पुणे मेट्रोस जागा देण्यास पालिका तयार 

पुणे मेट्रोस जागा देण्यास पालिका तयार 

Published On: Jan 11 2018 1:29AM | Last Updated: Jan 10 2018 10:59PM

बुकमार्क करा




पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तब्बल दहा जागांची मागणी पुणे मेट्रोने महापालिकेकडे केली आहे. त्या जागा देण्यास महापालिकेने तत्वत: सहमती दिली आहे. 

या संदर्भात मंगळवारी (दि.9) महापालिकेत बैठक झाली. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, महामेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या स्ट्रॅटेजीक प्लॅनिंग विभागाचे व्यवस्थापकीय संचालक रामनाथ सुब्रमण्यम, निवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश कदम, महापालिकेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर, भूमी व जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त विजय खोराटे, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे आदी उपस्थित होते. बैठकीत जागा हस्तांतरणासंदर्भात चर्चा करण्यात आली. 

पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी ते दापोडी या 7.15 किलोमीटर अंतर मार्गावर पुणे मेट्रोचे काम वेगात सुरू आहे. या मार्गावरील एकूण 10 जागा मेट्रोला विविध कारणांसाठी हवे आहेत. त्यात महापालिकेच्या ताब्यातील महापालिका भवनाच्या प्रवेशद्वाराजवळील, संत तुकारामनगर, नाशिक फाटा उड्डाणपुल, जुना फुगेवाडी जकात नाका, महापालिका भवनासमोरील वाहनतळाच्या बाजूची जागा, मोरवाडी चौकातील आणि फुगेवाडी जकात नाका या जागांची मागणी मेट्रोने केली आहे.  

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, पुणे महामेट्रोने पालिकेच्या ताब्यातील दहा ठिकाणच्या जागा मागितल्या आहेत. महामेट्रोला कोणती जागा आणि किती जागा पाहिजे, याबाबत चर्चा झाली. कोणती जागा द्यायची हे निश्चित झाल्यावर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे प्रस्ताव आणला जाईल. सभेच्या मान्यतेनंतर मेट्रोकडे जागा हस्तांतरीत केली जाईल.