Sun, Mar 24, 2019 17:11होमपेज › Pune › नगरसेवकांच्या पाट्यांचा शहरात सुळसुळाट

नगरसेवकांच्या पाट्यांचा शहरात सुळसुळाट

Published On: Apr 09 2018 1:58AM | Last Updated: Apr 09 2018 1:58AMपुणे : हिरा सरवदे

प्रभागामध्ये सोसायट्या, उद्याने, शाळा-महाविद्यालये, दवाखने, रस्ते, चौक, ऐतिहासीक वास्तू, विविध संस्था आदींची नावे लिहलेल्या पाट्या आणि फलक लावणे प्रत्येक नगरसेवकांना बंधनकारक आहे का ? असा प्रश्‍न शहरातील पाट्यांचा सुळसुळाट पाहुन आपसुकच मनात येतो आहे. एकाच ठिकाणी एकाच नावाच्या दोन, तीन आणि चार-चार पाट्या प्रभागातील नगरसेकांनी लावल्याचे चित्र शहरभर पहायला मिळत आहे. नगरसेवकांच्या या चमकोगीरीमुळे नागरिकांनी कर रुपाने भरलेल्या पैशाची मात्र उधळपट्टी होत आहे. विशेष म्हणजे पाट्यांसंदर्भात महापालिकेचे कोणतेही धोरण ठरलेले नाही.

महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध रस्त्यांवर कायमस्वरुपी दिशादर्शक कमानी तयार करून बाणासह रस्त्यांची नावे लिहीली आहेत. याशिवाय विविध रस्ते, चौक, पुतळे, उद्याने, ऐतिहासीक वास्तू, नाट्यगृहे, सभागृह, विविध संस्था, लोकप्रतिनीधींची निवास्थाने आदी ठिकाणी नावांसह पाट्या लावल्या आहेत. असे असतानाही नगरसेवकांकडून पुन्हा प्रभागातील सोसायट्या, उद्याने, शाळा-महाविद्यालये, दवाखने, रस्ते, चौक, ऐतिहासीक वास्तू, विविध संस्था आदी ठिकाणी नावाच्या पाट्या आणि फलक लावले गेले आहेत.

चार सदस्यीय प्रभाग रचना असल्याने एकाच ठिकाणी एकच नावाच्या दोन, तीन आणि चार-चार पाट्या लावल्या गेल्या आहेत. नगरसेवकांमधील हे ‘पाटीयुद्ध’ त्यावरील ‘संकल्पना किंवा सौजन्य’ या ओळीमुळे सुरू झाले आहे. एका नगरसेवकाने नावाची पाटी लावल्यानंतर आपल्याही नावाची पाटी झळकावी, या मानसिकतेतून दुसरा नगरसेवकही आपली पाटी लावतो, हे कोणीही नाकारू शकत नाही. अनेक चौकांमध्ये एकाच नगरसेवकाने चौकाचे नाव असलेल्या चार-चार पाट्या लावलेल्या आहेत.

पालिकेच्या पैशातून लावलेल्या कोणत्याही पाटीवर आणि फलकावर संकल्पना किंवा सौजन्य म्हणून नगरसेवकांनी स्वतःची नावे टाकू नयेत, असा संकेत आहे. मात्र हा संकेत ढाब्यावर बसवून सर्वच राजकीय पक्षाचे नगरसेवक-नगरसेविका सर्रासपणे संकल्पना म्हणून स्वत:ची नावे टाकतात. या पाट्या वॉर्ड ऑफीसच्या पातळीवर लावल्या जात असल्याने नगरसेवकास सांगण्याचे किंवा शिकविण्याचे धाडस कोणीही अधिकारी-कर्मचारी करत नाहीत. 

पाट्यांच्या माध्यमातून पक्षांचा प्रचार :

महापालिकेच्या पाट्यांची रचना आजवर निळ्या किंवा हिरव्या रंगाच्या पाटीवर पांढरी अक्षरे, अशी पहायला मिळत होती. मात्र पालिकेत सत्तांतर झाल्यानंतर भाजपच्या बहुसंख्य नगरसेवकांनी पक्षाचा भगवा आणि हिरवा रंग असलेल्या पाट्या पालिकेच्या पैशातून लावल्या आहेत. या पाट्यांवर पालिकेचा आणि स्मार्ट सिटीचा लोगो, पालिकेचे नाव, नगरसेवकाचे नाव, पालिकेतील पद आणि असेल तर पक्षातील पद आदींचा उल्लेख केलेला आहे. पालिकेच्या पैशातून राजरोसपणे पक्षाचा प्रचार करण्याचा नवीनच फंडा सत्ताधार्‍यांनी आणला आहे. या पाट्यांना पक्षाच्या झेंड्याचा रंग देण्याची सुरुवात मनसेने केल्याचे सांगितले जात आहे.

पाट्यांचे ‘भगवेकरण’ तर नाही ना ? :

अनेक मानणीयांनी प्रभागाच विविठध ठिकाणी पालिकेच्या निधीतून पाट्या लावतात. साधारण या पाट्याची रचना लक्षात घेतली तर पालिका आणि स्मार्ट सिटीच्या लोगोच्या मध्यभागी ‘पुणे महानगरपालिका’ असे नमुद केलेले असते. मात्र सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर, हिंगणे परिसरात लावलेल्या पाट्यांवर पालिका आणि स्मार्ट सिटीच्या लोगोच्या मध्यभागी ‘पुणे महानगरपालिकेच्या’ ऐवजी ‘जय श्रीराम’ असे लिहले आहे. संपूर्ण पाटी भगव्या रंगाची केलेली आहे. तसाच प्रकार सदाशिव, नारायण, शनिवार आणि बुधवार पेठेत पहायला मिळतो. या ठिकाणी एका नगरसेवकाने प्रभागातील प्रत्येक रस्त्यावर गणपती मंदिराकडे जाणारा रस्ता असे लिहलेल्या पाट्या लावल्या आहेत. पाट्यांवर देवा-धर्माची नावे लिहून आणि पाट्यांना भगवा रंग देऊन सत्ताधार्‍यांकडून पाट्यांचे ‘भगवेकरण’ तरी केले जात नाही ना? असा प्रश्‍न निर्माण होते. 

माजी लोकप्रतिनिधीच्या पाट्या ‘जैसे थे’ 

पालिकेकडून शहरातील आमदार, खासदार, मंत्री, महापौर, नगरसेवक, पालिकेतील पदाधिकारी यांच्या निवासस्थानाकडे जाणारे मार्ग दाखविणार्‍या पाट्या लावल्या जातात. हे लोकप्रतिनिधी आजी असताना लावलेल्या पाट्या त्यांचे पद गेल्यानंतर काढल्या जात नाहीत. त्यामुळे त्या वर्षानुवर्षे ‘जैसे थे’च परिस्थितीमध्ये राहतात. संबंधीत माजी लोकप्रतीनिधी पुन्हा पुन्हा या पाटीची रंगरंगोटी करून त्या चकाचक ठेवण्याचा प्रयत्न करतात. परिणामी आजी आणि माजी लोकप्रतिनिधींच्या पाट्यांची संख्या वाढतच जाते. त्यामुळे माजी लोकप्रतिनिधींच्या पाट्या त्यांचे ‘पद’ गेल्यानंतर काढून टाकणे गरजेचे आहे. 

पाट्यांसंबंधी पालिकेचे धोरणच नाही :

वॉर्ड पद्धती अस्तित्वात होती तेव्हा वॉर्डात एकाच नगरसेवकाची पाटी लागत होती. सध्या मात्र चार नगरसेवकांचा एक प्रभाग असल्याने प्रभागाचे हक्कदार वाढले आहेत. एका नगरसेवकाच्या नावाची एक पाटी लागल्यानंतर इतर नगरसेवकही त्याच पाटीच्या शेजारी त्याच नावाच्या आपापल्या पाट्या लावतात. हे प्रमाण दिसेंदिवस खूप वाढत आहे. फ्लेक्सबाजीमुळे शहराच्या विद्रुपीकरण होत असताना यात आत्ता या पाट्यांची भर पडत आहे. पाट्यांना पक्षाचे रंग वापरून पालिकेच्या निधीचा गैरवापर केला जात आहे. या पाट्यासंबंधी पालिकेने अद्याप कोणतेही धोरण तयार केलेले नसून ठोस धोरण तयार करण्याची वेळ आत्ता आली आहे, असे मत पालिकेतील एका वरीष्ठ अधिकार्‍याने व्यक्त केले आहे. 

नगरसेवकांची नावेच हटवा, संख्या कमी होईल  

नगरसेवकांकडून लावल्या जाणार्‍या पाट्यांसंदर्भात आम्ही पालिकेच्या कायदे सल्लागारांकडे तक्रार केली होती. या पाट्यासंबंधी पालिकेचे धोरणच तयार नसल्याचे सांगण्यात आले. मात्र एकाच नावाच्या दोन-तीन पाट्या एकाच ठिकाणी लावणे चुकीचे आहे. ही पुणेकरांच्या पैशाची नासाडी आहे. दर निवडणुकीवेळी या पाट्या झाकणे किंवा त्यावर पट्ट्या टिकटवण्यात पालिकेचे पैसे आणि वेळ वाया जातो, त्यामुळे अशा पाट्या लावल्या जाऊ नये. किंवा या पाट्यांवरी संकल्पना म्हणून टाकलेली नगरसेवकांची नावेच हटवली पाहिजेत, म्हणजे पाट्यांची संख्या कमी होऊल. -विवेक वेलणकर, माहिती अधिकार कार्यकर्ते*