Wed, Apr 24, 2019 21:56होमपेज › Pune › महापालिका प्रशासनाला धरले धारेवर

महापालिका प्रशासनाला धरले धारेवर

Published On: Jun 23 2018 1:22AM | Last Updated: Jun 23 2018 12:35AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सहकारी महिला अधिकारी व कर्मचार्‍यांवर विविध प्रकारे अत्याचार केले जात आहेत. या घटना वाढतच आहेत. या प्रकारांमुळे पालिकेची बदनामी होत असून, संबंधित तक्रारीची तातडीने शहानिशा करून दोषी अधिकार्‍याला तत्काळ निलंबित करण्याची आग्रही मागणी सर्वच पक्षाच्या सदस्यांनी केली. 

पालिकेच्या शुक्रवारी (दि.22) झालेल्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. ‘पुढारी’ त शुक्रवारीच्या अंकात ‘त्या अधिकार्‍यावर कारवाईची मागणी’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध झाले होतेे. त्याचा आधार घेत मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी सभागृहात पालिकेतील महिला अधिकारी व कर्मचार्‍यांवर अत्याचार केले जात आहेत. त्यांच्या तक्रारीच दखल न घेता, दोषी अधिकार्‍यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप केला. त्यावरून सभागृहात चर्चेला तोंड फुटले. वृत्तपत्रात सदर बातमी छापून येत आहे; मात्र, प्रशासन त्यावर काहीच करत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यावर तासभर चर्चा झाली. 

राष्ट्रवादीच्या मंगला कदम यांनी संंबंधित अधिकार्‍यावर कारवाईची मागणी केली. महिला अधिकार्‍यांनी सक्षमपणे काम करण्यासाठी आयुक्तांनी तक्रारीचे निरसन तातडीने करणे गरजेचे होते. राजकीय दबाव येऊन संबंधित महिला तक्रार मागे घेऊ शकते. भाजपच्या सीमा सावळे म्हणाल्या की, वृत्तपत्रात बातमी येताच, त्याची दखल घेऊन आयुक्तांनी कारवाई करायला हवी होती. तक्रारीतील सत्यता पडताळून वृत्तपत्राकडे खुलासा केला पाहिजे. 

आयुक्तांच्या बोटचेपी धोरणाचा निषेध करीत भाजपच्या प्रियंका बारसे म्हणाल्या की,  त्या अधिकार्‍याला तात्काळ निलंबित करावे, त्यानंतर चौकशी करावी. त्या अधिकार्‍यास पालिकेत ठेवू नका, अशी मागणी राष्ट्रवादीचे भाऊसाहेब भोईर यांनी केली. तक्रारीवर तात्काळ कारवाई न झाल्याने आयुक्तांवरील महिला कर्मचार्‍यांचा विश्‍वास उडाला आहे, असा आरोप त्यांनी केला. विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले की, पोलिसात तक्रार देण्यावरही तक्रारदार महिलेवर दबाव आणला गेला. आयुक्तांनीही त्याची दखल घेतली नाही. त्या अधिकार्‍यावर कारवाई झाली पाहिजे. आयुक्तांनी कारवाई न केल्यास आम्ही करू. शहराप्रमाणे पालिकेतही असे प्रकार घडत असल्याबद्दल शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी नाराजी व्यक्त केली. ही बाब निंदनीय असून, नेहमीप्रमाणे किरकोळ कारवाई न करता निलंबन करा, अशी मागणी त्यांनी केली. 

भाजपच्या झामाबाई बारणे व आशा शेंडगे यांनीही दोषी अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी केली. भाजप कोणत्याही दोषी अधिकार्‍यास पाठीशी घातल नसल्याचे तुषार कामठे यांनी स्पष्ट केले. महिलाचा आदर करीत असल्याने शिक्षण मंडळात 5 नगरसेविकांना संधी दिली आहे. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, तक्रारदार महिलेचे नाव जाहीर न करता, दोषी अधिकार्‍यावर कारवाई करावी. पुढे असे प्रकार घडू नये, यासाठी आयुक्तांनी कठोर पावले उचलावीत.

संबंधित प्रकरणाची तक्रारच नाही : आयुक्त

संबंधित तक्रार माझ्याकडे व टपालाद्वारे आलेले नाही. त्या संदर्भात वृत्तपत्रातून ही बाब  समजताच काही महिला अधिकार्‍यांना विश्‍वासात घेऊन चौकशी केली; मात्र, तसे काही झाल्याचे पुढे आले नाही. वृत्तपत्रांनी सजगतेतून ही बातमी दिली आहे; मात्र ती ऐकीव आधारावर आहे, असा दावा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केला. दोषी अधिकार्‍यांवर वेळेवेळी समज देऊन प्रसंगी कारवाईही केली जाते. तक्रारदारांनी आताही पुढे आल्यास दोषींवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. खुलासा करताना आयुक्त गहिवरले होते.