होमपेज › Pune › वानरलिंगीवरून सुळक्यावरून पडलेला गिर्यारोहक बचावला 

वानरलिंगीवरून सुळक्यावरून पडलेला गिर्यारोहक बचावला 

Published On: Dec 31 2017 1:47AM | Last Updated: Dec 31 2017 1:13AM

बुकमार्क करा
लेण्याद्री : वार्ताहर 

जुन्नर तालुक्यात  नाणेघाट परिसराच्या ऐतिहासिक किल्ले जीवधनजवळ असणार्‍या वानरलिंगी सुळक्यावर गिर्यारोहणासाठी आलेल्या दोन गिर्यारोहकांपैकी एक गिर्यारोहक 200 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना शनिवारी (दि. 30) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. नशीब बलवत्तर म्हणून खोल दरीत कोसळूनही केवळ झाडाला अडकल्याने या गिर्यारोहकाचा जीव वाचविण्यात बचाव पथकाला यश आले. 

भोर तालुक्यातील करंदी येथून प्रणय सावंत (वय 17) व शरण सावंत (वय 22) हे दोन गिर्यारोहक सकाळी सात वाजता नाणेघाट येथील वानरलिंगी सुळक्यावर गिर्यारोहणासाठी आले होते. वानरलिंगी सुळका चढण्यास सुरुवात केल्यानंतर 15 फूट अंतरावर गेल्यावर शरण सावंत याच्या हाताला वेदना होऊ लागल्यामुळे त्याचा हात निसटला व तो वानरलिंगी सुळक्याच्या पश्‍चिमेला जवळपास 200 फूट खोल दरीत कोसळला.

त्यावेळी त्याचा भाऊ मदतीसाठी आरडाओरडा करू लागल्याने जवळील हॉटेलचे चालक सुभाष आढारी यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी तातडीने जुन्नर पोलीस स्टेशनला संपर्क साधत घडलेला प्रकार सांगितला. वनरक्षक मेजर रमेश खरमाळे यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे, वनरक्षक  रमेश खरमाळे, घाटघर येथील सुभाष आढारी, नितीन शिंदे, हनुमंत भाल, सॅम पाडळे, एलेक्स मेन्डोंसा, विलास रावते, विष्णू शिंदे, रोहिदास आढारी या बचाव पथकाने  चार तास प्रयत्नांची शिकस्त करून या युवकाला वाचविले. या गिर्यारोहकाला उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे.