Thu, Mar 21, 2019 15:38होमपेज › Pune › वाकड परिसरात सर्वांधिक गृहप्रकल्प

वाकड परिसरात सर्वांधिक गृहप्रकल्प

Published On: Jun 28 2018 1:34AM | Last Updated: Jun 27 2018 11:58PMपिंपरी : मिलिंद कांबळे

पिंपरी-चिंचवड शहरात सर्वाधिक गृहप्रकल्प वाकड परिसरात होत असून, सन 2001 ते 2017 या 7 वर्षांतील आकडेवारीनुसार तब्बल 1 हजार 307 बांधकामांना पिंपरी-चिंचवड महापालिकेने बांधकाम परवाने दिले आहेत. त्यामुळे या परिसरात राहण्यासाठी नागरिक पसंती देत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. पाठोपाठ रहाटणी परिसरास पसंती दिली जात आहे. या 7 वर्षांच्या कालावधीत संपूर्ण शहरात एकूण 8 हजार 905 बांधकामांना परवाने दिले आहेत.  वाढती लोकसंख्या आणि पाणीटंचाई लक्षात घेऊन वाकड, ताथवडे, पुनावळे, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, रावेत, किवळे, मामुर्डी या भागातील 30 हजार 1 चौरस फुटांवरील गृहप्रकल्प बांधकामांना बांधकाम परवाना देण्यास तात्पुरती बंदी घातली आहे. हा निर्णय स्थायी समितीने 13 जूनला घेतला. त्याबाबत 19 जूनला दुरूस्ती करण्यात आली. त्या निर्णयावर आरोप-प्रत्यारोपाच्या फेर्‍या झडतच आहेत. 

या पार्श्‍वभूमीवर शहरात सर्वांधिक बांधकामे कोणत्या भागांत आहेत, त्याची उत्सुकता शहवासीयांना लागली होती. पालिकेच्या आकडेवारीवरून संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात वाकड परिसरात गृहप्रकल्प बांधकामे होत असल्याचे चित्र आहे. त्यानंतर रहाटणी परिसरात 669 बांधकामे झाली आहेत. चिंचवड परिसरात गेल्या 7 वषार्ंत एकूण 586 गृहप्रकल्प  झाले आहेत. चिखलीत 566, पिंपरी व रावेतमध्ये प्रत्येकी 540 बांधकामांना परवाने दिले आहेत. दिघी परिसरात 520, पिंपळे निलखमध्ये 512, मोशी, बोर्‍हाडेवाडीत 500, भोसरी व कासारवाडीत 392, थेरगावात 388 बांधकामे गेल्या 7 वर्षांत झाली आहेत. 

सर्वात कमी बांधकामे निगडी (22), दापोडी (48), सांगवी (94) व आकुर्डीत (113), मामुर्डी 115  बांधकामे गेल्या 7 वर्षांत झाली आहेत. आकडेवारीनुसार चिंचवड मतदार संघातील वाकड, ताथवडे, पुनावळे, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, रावेत, किवळे, मामुर्डी या भागांत तब्बल 3 हजार 323 गृहप्रकल्प बांधकामे परवाने 7 वर्षांत दिले गेले आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघातील भागांमध्ये एकूण 2 हजार 604 बांधकाम परवाने दिले आहेत. दरम्यान, तळवडे परिसरात रेडझोनमुळे बांधकामे परवाने दिले जात नाहीत. तर, दुसरीकडे बांधकाम परवाने न घेता शहरात अनधिकृत बांधकामे मोठ्या संख्येने उभी राहत आहेत.  बांधकाम परवाना विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, प्लॅन नुतनीकरणानंतर आणि टीडीआर अंतर्गत वाढीव बांधकाम करण्यासाठी पुन्हा बांधकाम परवाना घेतला जातो. त्यामुळे एकाच गृहप्रकल्पास 2 ते 3 वेळा परवाना घेतला जातो. मात्र, ही संख्या खूपच कमी आहे. 

2011 ते 2017 या काळातील परिसरानुसार बांधकाम परवाने वाटप

वाकड 1,307. रहाटणी : 669. चिंचवड  586. चिखली 566. पिंपरी 540. रावेत 540. दिघी 520. पिंपळे निलख 512. मोशी-बोर्‍हाडेवाडी 500. भोसरी-कासारवाडी 392. थेरगाव 388. किवळे 351. पिंपळे सौदागर 342. पिंपळे गुरव 280. पुनावळे 239. ताथवडे 239. चर्‍होली 139. डुडुळगाव 132. चोवीसावाडी 126. वडमुखवाडी 125. मामुर्डी 115. आकुर्डी 113. बोपखेल 104. सांगवी 94. दापोडी 48. निगडी 22. एकूण : 8 हजार 905