होमपेज › Pune › गायब युवा नेत्यांची गणेश जयंतीत ‘वर्दळ’

गायब युवा नेत्यांची गणेश जयंतीत ‘वर्दळ’

Published On: Jan 23 2018 1:25AM | Last Updated: Jan 22 2018 11:24PMपिंपरी : संजय शिंदे 

महापालिका निवडणूक फेब्रुवारी 2017 मध्ये पार पडली. विविध पक्षांकडून अनेक युवा नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी उमेदवार म्हणून आपले नशीब आजमाविले. त्यांपैकी विजयी उमेदवार सोडून सर्वांना पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे प्रभागस्तरावर कोणताही कार्यक्रम असला की, आवर्जुन हजेरी लावणार्‍या युवा व सामाजिक कार्यकर्त्यांनी जाहीर कार्यक्रमांकडे पाठ फिरविल्याचे दिसत होते; मात्र रविवारी (दि.21) गणेश जयंतीनिमित्त निवडणुकीनंतर पसार झालेल्या युवा व सामाजिक कार्यकर्त्यांची गणेश मंदिर परिसरात वर्दळ पाहावयास मिळाली.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये रविवारी मोठ्या उत्साहात गणेश जयंती साजरी करण्यात आली. सर्वच ठिकाणी प्रसाद व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या वर्षी गणेश जयंती सर्वच प्रभागांत मोठ्या उत्साहत साजरी करण्यात आली होती. पालिका निवडणुका महिना-सव्वा महिन्यावरच असल्याने इच्छुक उमेदवारांनी मोठ्या देणग्या दिल्यामुळे गणेश जयंती साजरी करणार्‍या मंडळांनी महाप्रसादाचे मोठे आयोजन केले होते.

अनेकांनी महाप्रसादाला मदत न करता गणेश मंदिरांमध्ये दर्शनाला गेल्यानंतर वर्गणी म्हणून मोठ्या रकमा देऊन गणेश जयंती साजरी करणार्‍या मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना खूष करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर फेब्रुवारी 2017 मध्ये निवडणुका पार पडल्या.प्रत्येक प्रभागातून विविध पक्षांचे पाच-पंचवीस उमेदवार उभे होते; परंतु त्यांतील  प्रत्येक प्रभागात चारच उमेदवार निवडून आल्यामुळे इतर पडलेल्या उमेदवारांनी जाहीर कार्यक्रमांकडे पाठ फिरविल्याचे दिसत होते.

नेहमीच प्रभागातील नागरिकांसाठी ‘तुमच्यासाठी काय पण’ म्हणणारे युवा व सामाजिक कार्यकर्ते दिसेनासे झाले होते. काही कामानिमित्त संबंधितांना फोन लावले वा भेटण्याचा प्रयत्न केला असता ते ‘नॉट रिचेबल’ होते; परंतु निवडणूक झाल्यानंतर जवळपास अकरा महिन्यांनी पार पडलेल्या गणेश जयंतीनिमित्त विविध पक्षांचे व अपक्ष म्हणून ज्यांनी पालिका निवडणुकीमध्ये नशीब आजमाविले ते प्रभागातील विविध मंदिरांमध्ये जाऊन गणेशाचे दर्शन घेत होते. 

देणगीचा आकडा उतरला

पालिका निवडणुकीपूर्वी झालेल्या गणेश जयंतीला इच्छुक उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर देणगी स्वरूपात मोठ्या रकमा मिळाल्या होत्या. मात्र या वर्षी निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर खर्च झाल्यामुळे देणगीचा आकडा कमी झाल्याचे पाहावयास मिळाले. अनेक पक्षीय पदाधिकार्‍यांनी हात आखडता घेतल्यामुळे मंडळातील कार्यकर्त्यांना नेहमीप्रमाणे वर्गणी जमा करून कार्यक्रम करावे लागल्याचे दिसत होते.