Fri, Jul 19, 2019 07:09होमपेज › Pune › थट्टा करणार्‍या सरकारला ताकद दाखवू : राजू शेट्टी

थट्टा करणार्‍या सरकारला ताकद दाखवू : राजू शेट्टी

Published On: Jul 16 2018 1:22AM | Last Updated: Jul 16 2018 1:15AMपुणे : प्रतिनिधी 

राज्यातील शेकर्‍यांना दूध उत्पादनाचा खर्च परवडत नाही. सरकारने शेतकर्‍यांना प्रतिलिटर पाच रुपये दरवाढ करावी. अन्यथा रविवारी मध्यरात्रीपासून दूध बंद आंदोलनाची सुरुवात होणार आहे. दूध बंद आंदोलन केल्यास कायदा आपले काम करेल असे म्हणणार्‍या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी आपली ताकद दाखवतील. सरकारने शेतकर्‍यांच्या सहनशीलतेचा सरकाने अंत पाहू नये. आंदोलन दडपण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना शेट्टी म्हणाले, शेतकर्‍यांची सर्वच बाजूने पिळवणूक होत असल्यामुळे वाढणार्‍या शेतकरी आत्महत्यांना चंद्रकांत पाटलांसारखे मंत्री व्यसनाचे कारण सांगत आहेत. दूध दरवाढीचा बोजा ग्राहकांवर टाका, असे आमचे म्हणणे नाही. सरकारने याची पूर्ण जबाबदारी घेऊन बफर स्टॉक करावा. दुधाची निर्यात करावी, काही करुन शेतकर्‍यांना न्याय द्यावा, ही आमची मागणी आहे. सरकारने निर्णय वेळेवर न घेतल्यामुळेच शेतकर्‍यांना दूध बंद आंदोलन करण्याची वेळ आली आहे. 

सरकराने कितीही दडपशाही केली, तरी शेतकरी आता शांत बसणार नाही. तसेच मागणी पूर्ण होईपर्यत आंदोलन सुरूच राहणार आहे, असेही शेट्टी यावेळी म्हणाले. 

आत्महत्या सरकारसाठी चेष्टेचा विषय... 

सरकारकडे शेतकर्‍यांकडे पाहण्यासाठी वेळ नाही. राज्यात किडे, मुंगी मरावेत, तसे शेतकरी मरत आहेत. शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा सरकारसाठी चेष्टेचा विषय झाला आहे. सरकार शेतकर्‍यांच्या विषयांकडे गांभीर्याने न पाहता आपली जबाबदारी झटकत आहे. शाळा बंद करून सरकारने शेतकर्‍यांच्या मुलांनी हमाल, ड्रायव्हर होण्याची व्यवस्था केली असून सरकारचा चंगळवाद पोसण्यासाठी आम्ही गुलाम व्हायचे का, असा सवाल राजू शेट्टी यांनी जाहीर कार्यक्रमात उपस्थित केला.