Sun, May 26, 2019 00:38होमपेज › Pune › पितळ उघडे पडेल या भीतीने सभा तहकूब

पितळ उघडे पडेल या भीतीने सभा तहकूब

Published On: Jun 13 2018 1:34AM | Last Updated: Jun 13 2018 12:49AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभेत सत्ताधार्‍यांचे पितळ उघड होण्याची भीती सतावत आहे. त्यामुळेच कोणतेही ठोस कारण नसताना सत्ताधार्‍यांकडून वारंवार सभा तहकूब केली जात आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी मंगळवारी (दि.12) केला. 

सभेपुढे सशुल्क पार्किंग पॉलिसी, रस्त्यावर खड्डे शुल्क धोरण, खासगी कंपन्यांना भूमिगत फायबर केबल टाकण्यासाठी रस्ते खोदाई परवानगी आदी महत्वाचे विषय आहेत. तसेच, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी अनधिकृत बांधकामांसंदर्भात प्रश्‍न विचारले आहेत. त्या प्रश्‍नोत्तरावरूनही सत्ताधारी गोत्यात येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे गेली दोन महिने सर्वसाधारण सभाच झालेली नाही, असा आरोप साने यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची पालिकेत सत्ता असताना एकूण 65 हजार अनधिकृत बांधकामे होती. वर्षभरातच त्यामध्ये वाढ होऊन तब्बल 1 लाख 87 हजार अनधिकृत बांधकामे झाली आहे. या आकडेवारीवरून शहरात अनधिकृत बांधकामे जोरात सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. सत्ताधारी भाजपच अनधिकृत बांधकामांना अभय देत असल्याचे दिसत आहे, असा आरोप साने यांनी केला.  

शहरातील 31 डिसेंबर 2015 पूर्वीच्या अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी नियमानुसार केवळ 7 अर्ज पालिकेस प्राप्त झाले आहेत. इतर अर्ज अधिकार्‍यांच्या दबावामुळे आल्याचा आरोप त्यांनी केला. मुळात ही योजनास फसवी असल्याची टीका त्यांनी केली.  राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे सोमवारची (दि.11) तहकूब सभा पुन्हा तहकूब करण्यात आली. ती सभा तहकूब करण्यास आम्ही पाठींबा दिला. तास अर्ध्यातास सभा तहकूब करीत सभा घेता आली असते,  असे मत साने यांनी व्यक्त केले.

नागपूरच्या धर्तीवर घराचे मॉडेल करावे

नागपूरच्या धर्तीवर अर्ध्या ते 4 गुंठ्यांतील निवासी बांधकामाचे मॉडेल तयार करावे. त्याप्रमाणे त्यांना तत्काळ आवश्यक त्या सर्व परवानग्या दिल्या जाव्यात. पालिकेच्या बांधकाम परवानगी आणि नगररचना विभागाचे अधिकारी ‘आर्थिक’ लाभासाठी सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक करीत आहेत. त्यामुळे विविध परवानग्या आणि कागदपत्रे सादर करण्यात बराच कालावधी जात असल्याने नागरिक वैतागून विनापरवाना बांधकाम करतात, असा दावा साने यांनी केला. 

महापौरांनी  शिकवू नये

सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याने सभागृहात खासगी स्पीकर व माईक वापणार आहे. त्यासाठी रीतसर अर्ज केला आहे, असे दत्ता साने यांनी सांगितले. सभागृहात खासगी वस्तू आणता येणार नाही. तसेच विरोधकांना बोलू दिले जाते, या  महापौर काळजे यांच्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला. साने म्हणाले की, मंगला कदम, वैशाली घोडेकर, विनया तापकीर व माझा माईक बंद करा, असा आदेश महापौरांनी सभागृहात दिले होते. त्यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोमणा त्यांनी मारला.