Thu, Apr 25, 2019 13:29होमपेज › Pune › म्हशींच्या बाजाराचे अर्थकारण कोसळले

म्हशींच्या बाजाराचे अर्थकारण कोसळले

Published On: Jun 18 2018 1:11AM | Last Updated: Jun 18 2018 1:07AMपुणे : सुनील जगताप

दुधाला मिळणारा अल्प दर, चार्‍यासाठी होणार अधिकचा खर्च आणि देखभाल खर्चामुळे येथील बाजारात म्हशींना मागणी कमी झाली आहे. सध्या शहरात म्हशीच्या दुधाला 50 रुपये प्रतिलिटर दर मिळत असला तरी उत्पादकाला तेवढा दर मिळत नसल्याने याचा परिणाम या व्यवसायावर झाला आहे. 

म्हैसाना, जाफराबादी व पंढरपुरी या म्हशीच्या प्रामुख्याने महत्त्वाच्या प्रजाती असून बहुतांश म्हैसपालक व्यवसायाकरिता वरीलपैकी प्रजातीची निवड करतात. याव्यतिरिक्‍त ही पुण्याच्या बाजारात दिल्‍ली, सिंदण, सुरत, मुंडा, नारळी आदी प्रजातीच्या म्हशीच्या ही विक्रीसाठी आणल्या जातात. मुर्‍हा, दिल्ली, म्हैसाणा, जाफराबादी, रावी अशा दुधाळ म्हशी आपल्याकडे आहेत. मुर्‍हा म्हैस पंजाब, हरियाणा, दिल्ली या भागात आढळतात. मुंबई, पुणे भागात दूध विक्री चढ्या दराने होते. त्यामुळे मुर्‍हा म्हशींची मोठी आयात होते. मुर्‍हा म्हैस दररोज 10 ते 12 लिटर दूध देते. महाराष्ट्रातील पंढरपुरी, नागपुरी म्हैसही 8 ते 10 लिटर दूध देते. पंढरपुरी म्हशी सुक्या चार्‍यावरही तग धरतात. त्यामुळे त्यांचे संगोपन करणार्‍यांची संख्या अधिक आहे. पावसाने ओढ दिल्याने चार्‍याचा दर वाढला आहे. उन्हाळ्यात म्हैस कमी दूध देते तसेच सध्या बाजारात दुधाच्या अतिरिक्त उत्पादनामुळे शेतकर्‍यांना भाव मिळत नाही, अशी स्थिती असल्याने म्हैस खरेदी आणि विक्रीवर परिणाम झाल्याचे येथील बाजारात आलेले शेतकरी आणि व्यापार्‍यांनी सांगितले.

असे चालते अर्थकारण..

पुण्यात मुर्‍हा आणि म्हैसाना जातीच्या म्हशींना अधिक मागणी आहे. येथील बाजारात जास्त करुन भाकड म्हशीच विक्रीसाठी येतात. मुंबईतील उपनगरांतील गोठ्यातून आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणहून या म्हणी याठिकाणी येतात. प्रत्यक्ष शेतकर्‍याकडून मागणी कमी असते; तर, या म्हशींचे संगोपन करून पुन्हा विक्रीच्या माध्यमातून नफा मिळविणारे व्यापारी येथे येतात. याचे अर्थकारण तीन टप्यात चालते. भाकड म्हैस 50 ते 65 हजार रुपयांना खरेदी केली जाते. चांगली म्हैस निवडण्यासाठी येथील व्यापारी आणि डॉक्टरांचे निरीक्षण आणि ठोकताळे असतात. म्हैस खरेदी केल्यानंतर व्यापारी आपल्या गोठ्यात नेतात. शक्यतो दोन-तीन महिन्यांच्या गर्भवती म्हशींची खरेदी होते. म्हशीला रेडकू होइपर्यंतच्या पुढील चार ते पाच महिन्यांच्या कालावधीत ओला चारा, पेंड आणि औषधोपचार असा प्रतिमहिना 3 हजार रुपयांचा खर्च केला जातो. म्हैस चांगली धष्टपुष्ट झाल्यावर व्यायण्यापूर्वी (प्रसुती) पंधरा ते वीस दिवस आधी दूध उत्पादक शेतकरी अथवा गोठामालकांना ही म्हैस 1 लाख ते 1 लाख 20 हजाराला विक्री केली जाते. त्यानंतर दूध उत्पादक शेतकरी दूध, शेण आणि रेडकू या माध्यमातून उत्पन्न घेतो.