Wed, Aug 21, 2019 15:29होमपेज › Pune › पैशाच्या आमिषापोटीच मुलीचे जबरदस्तीने लग्न

पैशाच्या आमिषापोटीच मुलीचे जबरदस्तीने लग्न

Published On: Apr 24 2018 1:40AM | Last Updated: Apr 24 2018 1:34AMपिंपरी : प्रतिनिधी

पैशाच्या आमिषाला बळी पडून चाळीशी उलटलेल्या इसमासोबत लग्न करून दिल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. सांगवी पोलिस ठाण्यात याप्रकरणी 19 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पीडित तरुणीचे आई, वडील, पती, त्याची पहिली पत्नी, लग्न जमविणारे मध्यस्थी अशा 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या बाबत सात जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर करण्यात आले. 

सांगवी पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक केली असून अन्य चौघांना ताब्यात घेतले. तसेच भारतीय दंड विधान कलम 366, 384, 385, 341, 323, 504, 506 आणि 34 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्‍त प्रदीप देशपांडे, परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्‍त गणेश शिंदे, सहाय्यक पोलिस आयुक्‍त विक्रम पाटील, वरिष्ठ  पोलिस निरीक्षक अजय चांदखेडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक मधुमती शिंदे, महिला पोलिस शिपाई शिंत्रे, पोलिस नाईक डामसे, पोलिस कॉन्स्टेबल बनसोडे, वारे यांनी केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पती उत्‍तम काळे (वय 45, रा. तेरखेडा, जि. उस्मानाबाद) हा उच्चशिक्षित आहे. तो जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करीत आहे. त्याचे 15 वर्षांपूर्वी लग्न झाले असून त्यांना 14 वर्षाची मुलगी आहे. सुखाचा संसार सुरू असताना वंशाला दिवा हवा, या हव्यासापोटी शिक्षक पतीने दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला त्याच्या पहिल्या पत्नीने होकार देखील दिला. त्यानंतर नात्यातील गरीब कुटुंबाचा शोध सुरू झाला.

पीडित तरुणीच्या वडिलांवर पाच लाख रुपयांचे कर्ज आहे. घरची परिस्थिती बेताची आहे. त्यात मुलगी सुद्धा लग्नाच्या वयात आली असल्याचा गैरफायदा घेत मुलीच्या वडिलांना पुण्यामध्ये एक फ्लॅट आणि पाच लाख रुपयांचे कर्ज फेडण्याचे आमिष दाखवून 19 वर्षीय मुलीसोबत 30 मार्च 2018 रोजी लग्न केले. मुलीचे आई-वडील देखील या लग्नासाठी लगेच तयार झाले. याविषयी मुलीची संमती विचारात घेतली नाही. तिच्या मनाविरुद्ध तिच्यापेक्षा 16 वर्षांनी मोठ्या व्यक्‍तीशी तिचे लग्न लावले.

लग्न झाल्यानंतर 19 वर्षीय तरुणी सासरवरून सुटण्याची संधी शोधत होती. लग्नानंतर सहा दिवसांनी तिला ही संधी मिळाली. तिने मोबाईलमध्ये आपल्या तक्रारीचा व्हिडिओ तयार केला. तो उस्मानाबादच्या वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना पाठविला. उस्मानाबाद पोलिसांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी येरमाळा पोलिस ठाण्याला कळवले. येरमाळा पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी तिची सासरवरून सुटका करून मुलीला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले. माहेरी आल्यानंतर आई-वडिलांनी देखील सासरी नांदण्यासाठी तिचा छळ सुरु केला. मुलीने आई-वडिलांचे घर सोडून 20 एप्रिल 2018 रोजी थेट सांगवी पोलिस ठाणे गाठले.