Wed, Jul 24, 2019 05:42होमपेज › Pune › उद्यानात जिवंत ‘हँड ग्रेनेड’

उद्यानात जिवंत ‘हँड ग्रेनेड’

Published On: Mar 16 2018 1:22AM | Last Updated: Mar 16 2018 12:14AMपुणे /कोंढवा : प्रतिनिधी

एनआयबीएम उंड्री रस्त्यावर नव्याने विकसित होणार्‍या उद्यानामधील मातीत जिवंत हॅन्ड ग्रेनेड बॉम्ब सापडला असून, बॉम्बशोधक पथकाने तो सुरक्षितरीत्या ताब्यात घेतला. टायसन या श्‍वानाच्या मदतीने संपूर्ण उद्यानाची कसून तपासणी करण्यात आली असून, हा बॉम्ब येथे आला कसा याचा तपास कोंढवा पोलिस करीत आहेत.

कोंढवा खुर्द येथील एनआयबीएम उंड्री रस्त्यावरील कोणार्क इंद्रायूच्या जवळच पालिकेचे नव्याने उद्यान विकसित होत असून, या उद्यानामध्ये काही मुले खेळण्यासाठी आली होती. त्यांना खेळताना बॉम्ब दिसला त्यांनी तत्काळ सोबत असलेल्या परवीन तांबे यांच्या निर्दशनास आणून दिले. त्यांनी ती वस्तू पाहून त्याचा फोटो काढला व तो फोटो नगरसेविका नंदा लोणकर, नारायण लोणकर यांना दाखविला. या दरम्यान मातीमधला बॉम्ब कोणीतरी उचलून तो झाडाच्या फांदीवर ठेवला. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली.  

कोंढवा पोलिस ठाण्याचे उमाकांत स्वामी व चेतन कुंभार या कर्मचार्‍यांनी पाहणी करून तत्काळ बॉम्बशोधक  पथकाला पाचारण केले. या वेळी बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती. बॉम्बशोधक पथकाच्या कर्मचार्‍यांनी जिवंत बॉम्ब सुरक्षितरीत्या ताब्यात घेऊन, टायसन या श्‍वानाच्या मदतीने संपूर्ण परिसराची कसून तपासणी केली. या वेळी नगरसेवक गफूरभाई पठाण, स्वीकृत नगरसेवक संजय लोणकर, नारायण लोणकर, इम्तियाज शेख, जहीर शेख, यांनी पोलिसांना सहकार्य करत गर्दी हटविण्यासाठी मदत केली. नव्याने विकसित करण्यात येणार्‍या उद्यानातील मातीत नेमका बॉम्ब कोणत्या परिसरातून आला याची माहिती पोलिस घेत आहेत. हा बॉम्ब मुलांनी हातात घेऊन हाताळला असता तर याठिकाणी मोठा अनर्थ घडला असता. परवीन तांबे यांनी तत्काळ याची दखल घेतल्यामुळे अनर्थ टळला गेला.