Sat, Apr 20, 2019 18:27होमपेज › Pune › ‘मेट्रो’चे काम करणार्‍या कामगारांचा जीव धोक्यात

‘मेट्रो’चे काम करणार्‍या कामगारांचा जीव धोक्यात

Published On: Apr 10 2018 1:14AM | Last Updated: Apr 09 2018 11:34PMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरीमध्ये मेट्रोचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे; मात्र हे काम करणार्‍या कामगारांना सुरक्षेची कोणतीही साधने पुरविल्याचे दिसत नाही. त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात असून अपघात होण्याची शक्यता आहे. या कामगारांना सुरक्षा साधने देण्याची मागणी शहरातील नागरिक करत आहेत. 

राज्याच्या नागरीकरणाचा वेग वाढत आहे. रस्त्यांच्या बांधकामाबरोबरच सध्या मेट्रोचे बांधकामही सुरू आहे. पिंपरी ते स्वारगेट मेट्रोचा मार्ग निश्‍चित झाला आहे. तेव्हापासून पिंपरी येथे अनेक कामगार पहाटे पासूनच कामाला सुरूवात करत आहेत. मोठी पिलर्स, लोखंडी साहित्यांमध्ये या कामगारांना काम करावे लागत आहे. कामगार काम करत असताना त्यांना संबंधितांनी सुरक्षासाधने पुरविणे गरजेचे आहे. अन्यथा ते कामगारांच्या जीवावर बेतू शकते; मात्र मेट्रो प्रशासनालाही कामगारांबाबत अनास्था दिसत असल्याचे चित्र आहे. मेट्रोचे काम करणारे अनेक कामगार सुरक्षा साधनांविनाच काम करताना दिसत आहे. 

या कामगारांना गमबुट, हेल्मेट, हातमोजे, सेफ्टी बेल्ट आदीसह विविध सुरक्षा साधने पुरविणे गरजेचे आहे. ही सुरक्षा साधनेच न दिल्यामुळे कामगार त्या शिवाय काम करत आहेत. त्यामुळे एखादा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. संबंधीत कामगाराला नुकसान भरपाई मिळणार का ? असाही सवाल या वेळी नागरिक उपस्थित करत आहेत. 

या बरोबरच पिंपरी-चिंचवड शहराचा विचार केला, तर महापालिका हद्दीत अनेक परिसरात बांधकाम साईटचे काम वेगात सुरु आहे. या साईटचे काम सुरु असताना सुरक्षेची कोणतीही साधने न पुरविल्याने धोकादायक पद्धतीने काम करणार्‍या शेकडो कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये अनेक नामांकित बांधकाम व्यवसायिकांच्या साईटचा समावेश आहे. रोजगाराच्या शोधात हजारो बेरोजगारांना बांधकाम क्षेत्रात गवंडी, बिगारी, माल वाहतूक करणारे अशा विविध प्रकारचा रोजगार उपलब्ध झाला आहे. राज्याच्या विविध भागाबरोबरच कर्नाटकातील हजारो बेरोजगारांचा समावेश आहे. शहरातील विविध ठिकाणच्या साईटवर काम करताना सुरक्षेची साधने न पुरविल्याने शेकडो कामगारांना जीव गमवावा लागत आहे.

मेट्रोचे काम वेगात सुरू आहे. हे काम करण्यासाठी अनेक कामगार कार्यरत आहेत; मात्र त्यांच्याकडे कोणतीच सुरक्षासाधने उपलब्ध नाहीत. त्यांच्या जीवाला धोका असून कोणताही अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधीतांनी कामगारांना सुरक्षासाधने पुरविणे गरजेचे आहे. - गुलाब पानपाटील, संपर्कप्रमुख,  भारिप बहुजन महासंघ.

 

Tags : Pimpri, Pimpri news, Metro, Metro work, workers, danger,