Thu, May 23, 2019 04:25होमपेज › Pune › संत गाडगे महाराज शाळेतील विद्यार्थी असुरक्षित प्रशासनाचे दुर्लक्ष  

संत गाडगे महाराज शाळेतील विद्यार्थी असुरक्षित प्रशासनाचे दुर्लक्ष  

Published On: Mar 14 2018 1:19AM | Last Updated: Mar 13 2018 11:57PMकोंढवा : वार्ताहर

मुख्य रस्त्यावरच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ, शिवनेरीनगरकडून येणारा अति तीव्र उतराचा रस्ता म्हणजे कर्दनकाळ, शाळेच्या बाहेर रस्त्यावर विविध पदार्थ घेऊन विकणारे विक्रते या सर्वांच्या गर्तेमध्ये संत गाडगे महाराज शाळेतील विद्यार्थ्यांचे जीवनमान अगदीच असुरक्षित बनले असून, मनपा प्रशासनाने व स्थानिक प्रतिनिधींनी तब्बल 4 हजार 500 विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी योग्य ती काळजी घेण्याची वेळ aआहे.

कोंढवा खुर्द येथील संत गाडगे महाराज प्राथमिक शाळा मराठी, इग्रजी, उर्दू विविध 7 शाळा येथे भरविल्या जातात. जवळपास 4 हजार 500 विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. या शाळेच्या जागेमध्ये संत गाडगे महाराज यांनी वास्तव्य केले होते. असे जुने जाणकार लोक सांगतात. यामुळेच या शाळेला संत गाडगे महाराज यांचे नाव दिले आहे. आज याच शाळेतील विद्यार्थी असुरक्षितरित्या शिक्षण घेत आहेत. शाळेच्या मुख्य दरवाज्याला लागून मुख्य रस्त्याची सुरवात होते. वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ पाहायला मिळते. येथील विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडणे मुश्किल होते. परिसरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुटतात त्यावेळी येथील सुरक्षारक्षक रस्त्याची वाहतूक थांबवून विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी मदत करतात, पण मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना स्वत:ची काळजी घेत रस्ता ओलंडावा लागतो. शाळेच्या दोन्ही बाजूने शिवनेरीनगरकडे जाण्यासाठी रस्ते आहेत. हे अति तीव्र उताराचे रस्ते असून येथे अनेक अपघात झाले आहेत. जवळपास 5 ते 6 लोकांना आपले प्राण गमवावे लागलेत तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. या रस्त्यावर ही मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असून येथे कोणत्याही प्रकारचे गतिरोधक बसविण्यात आले नाहीत. या मुळे या रस्त्यावर अपघातांची शक्यता नाकारता येणार नाही.

संत गाडगे महाराज शाळेच्या बाहेर काही खाद्य विक्रते, फेरीवाले व कायमस्वरूपी भिंतीलगत बसून विविध पदार्थाची विक्री करताना दिसतात. अनेक प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये उघड्यावर विविध पदार्थ घेऊन बसलेले असतात. ज्या ठिकाणी जमिनीवर बसतात त्याच ठिकाणी ड्रेनेजचे व मुतारीतील पाणी वाहतांना पाहायला मिळत आहे. विविध पदार्थांवर माशांचे थवेच्या थवे बसलेले पाहायला मिळतात. या खाद्य पदार्थांमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. तब्बल 4 हजार 500 विद्यार्थी येथे शिकतात. याची दखल प्रशासनाने घ्यायला हवी. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात. त्याचबरोबर सर्वसामान्य गरीब कुटुंबातील लोकच या ठिकाणी विद्यार्थ्यांना खाऊ विकतात. प्रत्येकाची मजबुरी आहे मात्र, विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळणे योग्य नाही, त्यामुळे अशा विक्रेत्यांना शाळेच्या आसपास खाद्यपदार्थाची विक्री करू देवू नये. अशी पालकांची मागणी आहे.