Wed, Apr 24, 2019 11:30होमपेज › Pune › ‘फर्ग्युसन’मध्ये तळीरामांची दारू पार्टी

‘फर्ग्युसन’मध्ये तळीरामांची दारू पार्टी

Published On: Jul 30 2018 1:31AM | Last Updated: Jul 30 2018 1:07AMपुणे : प्रतिनिधी 

फर्ग्युसन महाविद्यालयातील अ‍ॅम्पी थिएटरच्या मागील मैदानात रविवारी दुपारीच तळीरामांची दारू पार्टी रंगली होती. मैदानावर खेळणार्‍या विद्यार्थ्यांनी दारू पिणार्‍या तळीरामांना विचारणा केल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऐनवेळी पोलिस आल्याने अनुचित प्रकार घडला नाही. परंतु, या घटनेमुळे महाविद्यालय आणि मैदान परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, मद्यापींचा त्रास विद्यार्थी, खेळाडू आणि ज्येष्ठ नागरिकांना होत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मागे मोठे मैदान आहे. या मैदानात विद्यार्थी आणि खेळाडूंशिवाय कोणी येऊ नये, यासाठी प्रशासनाने सुरक्षा भिंत बांधली आहे. मात्र, या सुरक्षा भिंतीला भगदाड पडल्याने मैदानात अनेक तरुण दुचाकी घेऊन येत असल्याचा प्रकार गेल्या काही दिवसांपासून घडत आहे. दुपारी मैदानावर येणार्‍या विद्यार्थी आणि खेळाडूंची संख्या कमी असल्याने गेल्या काही दिवसांपासून काही तळीरामांचे टोळके भिंतींवर बसून सर्रास मद्य प्राशन करत असल्याचे विद्यार्थी आणि खेळाडूंना पाहायला मिळत आहे. रविवारी दुपारी या टोळक्याची दारू पार्टी सुरू असताना काही विद्यार्थी मैदानावर क्रिकेट खेळत होते. खेळताना चेंडू मद्यप्राशन करणार्‍यांच्या बाजूने गेल्यावर त्यांनी विद्यार्थ्यांना दमदाटी आणि शिवीगाळ केली. त्यानंतर काही वेळाने चेंडू हा टोळक्यातील तरुणाच्या दुचाकीला लागल्यावर एक तरुणाने बिअरच्या बाटलीने विद्यार्थ्यांना मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मद्यपी तरुण आणि विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली.

प्रकरण वाढत असल्याचे लक्षात आल्यावर एका विद्यार्थ्यांने पोलिस नियंत्रण कक्षाला संपर्क करून घटनेची माहिती दिली. पोलिस येणार याची कुणकूण लागल्यानंतर त्या तरुणांनी पळ काढला. त्यानंतर डेक्कन पोलिस ठाण्यातील एका पोलिसाने घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. याबाबत विद्यार्थ्यांनी सांगितले की, मैदानाच्या सुरक्षा भिंतीला भगदाड पडल्याने मैदानावर तरुणांचे टोळके येऊन धुमाकूळ घालतात. दुपारी आणि रात्री दारू पार्टी करतात. त्यांचा त्रास मैदानावर खेळण्यासाठी येणार्‍या विद्यार्थी आणि खेळाडूंना होतो. त्यामुळे महाविद्यालय प्रशासनाने तत्काळ मद्यापींचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे. याबाबत पोलिसांशी संपर्क साधला असता डेक्कन पोलिसांनी सांगितले की, दारू पार्टीबाबत माहिती येताच घटनास्थळाला भेट दिली. परंतु, त्या ठिकाणावरून तळीराम पसार झाले होते. त्यामुळे घटनेची नोंद केली नाही.