Wed, Jun 26, 2019 11:48होमपेज › Pune › शिकाऊ वाहन परवानाधारक तब्बल ५० हजारांनी  घटले

शिकाऊ वाहन परवानाधारक तब्बल ५० हजारांनी  घटले

Published On: Apr 09 2018 1:31AM | Last Updated: Apr 09 2018 12:04AMपुणे : नवनाथ शिंदे

राज्यातील सर्वाधिक वाहनांची संख्या असलेल्या पुणे आणि पिंपरी शहरात दिवसेंदिवस वाहन परवाना काढणार्‍या नागरिकांची संख्या वाढली आहे. मात्र, 2017-18 च्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अहवालानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 50 हजार शिकाऊ वाहन परवानाधारक (लर्निंग लायसन्स) घटले आहेत. त्यामध्ये 16 ते 18 वयोगटातील अर्जदारांची संख्या सर्वाधिक आहे. पक्का परवाना काढण्यासाठी दरदिवशी 300 जणांना ऑनलाईन अपॉइंटमेंट दिली जातो. मात्र, अर्जदारांनी वेळेत अपॉइंटमेंट न घेतल्यामुळे आणि 50 सीसी पेक्षा कमी क्षमतेची वाहने उपलब्ध नसल्यामुळे शिकाऊ वाहन परवानाधारकांची संख्या घटली आहे. 

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मिळून जवळपास 26 लाखांवर दुचाकींची संख्या आहे. दरम्यान, वाहतूक विभागाकडून वाहन परवाना नसल्यास दंडात्मक कारवाईचा वेग वाढविण्यात आला आहे. प्रामुख्याने महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांकडून शिकाऊ वाहन परवाना काढण्यास प्राधान्य दिले जाते.  शिकाऊ वाहन परवान्याची मुदत सहा महिने असून, त्याची फी 201 रुपये एवढी आहे. त्यानंतर पक्का परवाना काढला जातो. 

केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार 16 ते 18 वयोगटातील अर्जदारांना शिकाऊ वाहन परवाना देण्यात येतो. त्यासाठी 50 सीसीपेक्षा कमी क्षमतेची दुचाकी असणे आवश्यक असते. 2016-17 मध्ये शहरातील बहुतांश महाविद्यालयीन तरुणांनी शिकाऊ वाहन परवाना काढण्यास प्राधान्य दिले होते. मात्र, 50 सीसी क्षमतेची दुचाकी नसल्यामुळे लर्निंग वाहनधारकांची संख्या घटली आहे.

दरम्यान, वाहतूक विभागाच्या कारवाईपासून सुटका करण्यासाठी बहुतांश महाविद्यालयीन तरुणांकडून तात्पुरता शिकाऊ वाहन परवाना काढून कामचलाऊपणा केला जात असल्याचे लक्षात येत आहे. शिकाऊ वाहन परवान्याची मुदत सहा महिन्यांची असल्यामुळे वयोमर्यादा कमी असलेल्या अनेकांकडून दर सहा महिन्यांला नवीन शिकाऊ वाहन परवाना काढून वेळ मारून नेली जात असून, अनेक जण तर विना परवाना गाड्या उडवत असल्याची शक्यताही या निमित्ताने व्यक्त करण्यात येत आहे.

 

Tags : pune, pune news, rto, learner license,