Mon, May 27, 2019 07:57होमपेज › Pune › ‘टेमघर’च्या बहुचर्चित गळतीचे काम अर्धवटच

‘टेमघर’च्या बहुचर्चित गळतीचे काम अर्धवटच

Published On: Jul 06 2018 1:34AM | Last Updated: Jul 06 2018 1:14AMवेल्हे : दत्तात्रय नलावडे

पुणे शहर व परिसराला पाणीपुरवठा करणार्‍या टेमघर धरणाच्या बहुचर्चित गळतीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार करणार्‍या गुणनियंत्रण विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना संबंधित ठेकेदार व जलसंपदाच्या अधिकार्‍यांकडून दमदाटी करण्यात आल्याचे पुढे आले आहे. तर दुसरीकडे टेमघरच्या गळतीचे काम अर्धवटच असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन दिवसांपासून टेमघर धरण परिसरात विक्रमी पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ सुरू आहे. 

टेमघरच्या गळतीचा प्रश्‍न यंदाच्या पावसाळ्यातही काही प्रमाणात कायम राहणार आहे. त्यामुळे धरणात यंदाच्या पावसाळ्यात 100 टक्के पाणीसाठा होणार नसल्याचे पुढे आले आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे टेमघरची गळती गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे सरकार जाऊन भाजप आघाडीचे सरकार आले तरी टेमघरची गळती बंद करण्याचे काम अर्धवटच आहे. गेल्या वर्षभरापासून गळती बंद करण्याच्या कामातच निकृष्ट दर्जा असल्याची काही अधिकार्‍यांची तक्रार आहे. टेमघर धरणाच्या गळतीचे काम पूर्ण करण्यास दोन वर्षांचा कालावधी लागणार असून गळती बंद करण्याचे काम दर्जेदार झाले आहे. गळती बंद करण्याच्या कामामुळे धरणाची भिंत अधिक मजबूत झाली आहे, असा दावा टेमघर जलसंपदा विभागाने केला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून टेमघर धरणाच्या मुख्य भिंतीतील गळती बंद करण्याचे काम सुरू आहे. टेमघर धरण जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील प्रशिक्षणे म्हणाले, खडकवासला येथील केंद्रीय जल संशोधक केंद्राचे तंत्रज्ञ यांच्या देखरेखीखाली, तसेच आधुनिक पद्धतीने मुख्य भिंतीतून होणारी पाण्याची गळती बंद करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत 50 टक्के ग्राउटींगचे काम पूर्ण झाले आहे. दर्जेदार काम केले आहे.त्यामुळे पाणीसाठा होऊनही भिंतीच्या तळापासून गळती होत नाही. निकृष्ट दर्जाची तक्रार करण्यात आली असली तरी या तक्रारीत किती तथ्य आहे, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट करणार आहे. पावसाळ्यात सिमेंट भरून गळती बंद करण्याचे काम करता येणार नाही. मात्र इतर कामे केली जाणार आहेत, असे प्रशिक्षणे यांनी सांगितले. 

टेमघर धरणाच्या जवळपास एक किलोमीटर अंतर लांबीच्या मुख्य भिंतीला अनेक ठिकाणी भगदाडे, गळतीची ठिकाणे आहेत. 30 मीटर अंतराची अशी 27  गळतीची ठिकाणे निश्चित करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दर्जेदार सिमेंट, फ्लायाश व सिलीकॉन यांचे मिश्रण स्वयंचलित मशिनने योग्य प्रमाणात वजन करून गळती होणार्‍या ठिकाणी ओतले जावे. तसेच या सर्व कामाचे स्काडा सिस्टिम पध्दतीने रेकॉर्डींग करण्यात यावे, असे या टेंडरमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. धरणाच्या दुरुस्तीचे काम अधिक दर्जेदार व पारदर्शक व्हावे यासाठी टेंडरमध्ये विशेष काळजी घेण्यात आली होती. दुरुस्तीचे काम योग्य दर्जाने होत आहे का, तसेच योग्य प्रमाणात दर्जेदार साहित्य वापरले जाते का, याची माहिती स्काडा सिस्टिम पध्दतीमुळे तत्काळ जलसंपदा अधिकार्‍यांना  समजणार होते. अत्यंत निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे टेमघर धरण संवेदनशील व कुमकुवत असल्याने दुरुस्तीचे काम अधिक दर्जेदार पध्दतीने व्हावे यासाठी दुरुस्तीच्या टेंडरमध्ये या स्काडा सिस्टिम पध्दतीचा समावेश करण्यात आला. मात्र आता गळतीच्या कामावर देखरेख करणार्‍या गुणनियंत्रण विभागाच्या अधिकार्‍यांना दमदाटी करण्यात आल्याच्या कथित प्रकरणामुळे पुन्हा एकदा टेमघर चर्चेत आले आहे.
गुरुवारी (दि.5) दुपारी टेमघर धरणाच्या मुख्य भिंतीची पाहणी केली असता गेल्या काही वर्षांपासून धरणाच्या भिंतीच्या तळापासून होणारी पाण्याची गळती काही प्रमाणात बंद झाल्याचे दिसून आले.