Mon, Aug 19, 2019 10:06होमपेज › Pune › ‘पंतप्रधान आवास’ चर्‍होली, रावेत प्रकल्पांसाठी २२० कोटी

‘पंतप्रधान आवास’ चर्‍होली, रावेत प्रकल्पांसाठी २२० कोटी

Published On: Feb 25 2018 1:16AM | Last Updated: Feb 24 2018 10:25PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील गोरगरीब कुटुंबांना परवडणारी घरे देण्याचा दृष्टीने पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘पंतप्रधान आवास योजने’अंतर्गत ठोस पाऊल उचलले आहे. चर्‍होलीतील 1 हजार 442 सदनिकांसाठी 132 कोटी 50 लाख आणि रावेतमधील 934 सदनिकांसाठी 88 कोटी 25 लाख रुपये असे एकूण 220 कोटी 75 लाख खर्चाचे काम मन इन्फ्रा कन्स्ट्रक्शनकडून करून घेण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव बुधवारी (दि.28) होणार्‍या स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळताच महिनाभरात प्रत्यक्ष कामास सुरुवात होण्याची शक्यता आहे. 

‘पंतप्रधान आवास’चे भूमिपूजन लवकरच; चर्‍होली, रावेत प्रकल्पाच्या निविदा अंतिम टप्प्यात; बोर्‍हाडेवाडीची फेरनिविदा’ या शीर्षकाखाली ‘पुढारी’ने 15 फेबु्रवारीला वृत्त प्रसिद्ध केले होते. सदर कामाची निविदा मंजुरीसाठी ‘स्थायी’समोर आल्याने प्रत्यक्ष काम लवकरच सुरू होणार हे स्पष्ट झाले आहे. 

पालिकेकडून शहरातील चर्‍होली, रावेत, डुडुळगाव, बोर्‍हाडेवाडी, चिखली, पिंपरी, आकुर्डी, वडमुखवाडी, दिघी या विविध 10 ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेतील सदनिका बांधल्या जाणार आहेत. एकूण 9 हजार 458 सदनिका उभारल्या जाणार आहेत. त्यांतील काही प्रकल्पांच्या ‘डीपीआर’ला  राज्य व केंद्र शासनाने मान्यताही दिली आहे. त्यांपैकी चर्‍होली व रावेत प्रकल्पाची निविदाही मंजूर झाली आहे. 

चर्‍होली प्रकल्पासाठी मन इन्फ्राकडून 23 कोटी 29 लाख 41 हजार 533 रुपयांनी अधिक म्हणजे 145 कोटी 62 रुपये दराने निविदा प्राप्त झाली. दर कमी करून देण्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यास आला. ठेकेदाराने 132 कोटी 50 लाखांत काम करण्याची तयारी दर्शविली. ‘एसएसआर’नुसार या कामाची किंमत व इतर दर लक्षात घेऊन 130 कोटी 9 लाख 89 हजार 172 इतकी होते. हा दर निविदा स्वीकृत दरापेक्षा 2 कोटी 40 लाख 10 हजार 828 म्हणजे 1.84 टक्के अधिक आहे. 

रावेत प्रकल्पासाठी 100 कोटी 91 लाखांची निविदा मन इन्फ्राकडून प्राप्त झाली. ही रक्कम निविदा दरापेक्षा 21 कोटी 45 लाख 7 हजार 210 रुपये आहे. पत्रव्यवहारात ठेकेदाराने ही रक्कम घटवून 88 कोटी 25 लाख केली. ‘एसएसआर’नुसार कामाची किंमत  व इतर फरक लक्षात घेऊन 86 कोटी 68 लाख 14 हजार 258 इतकी होते. हा दर निविदा स्वीकृत दरापेक्षा 1 कोटी 57 लाख 85 हजार 742 म्हणजे 1.82 टक्के अधिक आहे.  

चर्‍होली व  रावेत प्रकल्पाची कामे सदर दराने करून घेण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव  बुधवारी होणार्‍या स्थायी समिती सभेपुढे ठेवला आहे. ‘स्थायी’कडून या कामास ‘हिरवा कंदील’ दाखविला जाण्याची दाट शक्यता आहे. मंजुरी मिळताच कायदेशीर बाबी पूूर्ण करून करार पूर्ण होऊन महिनाभरात प्रत्यक्ष काम सुरू होण्याची शक्यता आहे.