Fri, Apr 26, 2019 18:20होमपेज › Pune › रत्नागिरी हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात

रत्नागिरी हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात

Published On: May 14 2018 1:55AM | Last Updated: May 14 2018 1:23AMपुणे : प्रतिनिधी

रत्नागिरी हापूसचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. पुढील 15 दिवस रत्नागिरी, तर आणखी एक महिना कर्नाटक हापूसची चव पुणेकरांना चाखता येणार आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत दोन्ही हापूसचे दर 20 टक्क्यांनी उतरले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य पुणेकरांसाठी आता हापूस आवाक्यात आला आहे. रविवारी गुलटेकडी मार्केट यार्डात रत्नागिरीहून साडेसात हजार पेट्या, तर कर्नाटकातून 20 हजार बॉक्स आंब्यांची आवक झाल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली. 

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, कुणकेश्‍वर, पावस, संगमेश्‍वर, मिरेबंदर, सावंतवाडी व रत्नागिरीच्या इतर भागातून आंबा दाखल झाल्याचे सांगून रत्नागिरीचे व्यापारी अरविंद मोरे म्हणाले, की हळूहळू आंब्याची आवक कमी होण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या आठवड्यात 10 हजार पेटी आवक झाली होती. ती आता साडेसात हजारापर्यंत कमी झाली आहे. सध्या बाजारात 4 ते 8 डझनाच्या कच्च्या पेटीस 700 ते 1800 रुपये तर तयार आंब्यास 1200 ते 2000 रुपये भाव मिळत आहे.

गेल्या आठवड्याच्या तुलनेत रविवारी हापूसची आवक घटल्याचे सांगून व्यापारी रोहन उरसळ म्हणाले, की रविवारी कर्नाटकातून हापूसची 20 हजार पेटींची आवक झाली. आवक घटूनही मागणी अभावी हापूसच्या भावात 10 ते 20 टक्क्यांनी घट झाली. येत्या काही दिवसांमध्ये आवकेत वाढ होऊन भावामध्ये आणखी घसरण होण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली. रविवारी बाजारात कर्नाटक हापूसच्या 4 डझनाच्या बॉक्सला 600 ते 900 रुपये, पायरीला 400 ते 600 रुपये दर मिळाला. तर लालबागची 20 ते 30, बदाम 20 ते 30 आणि मल्लिका आंब्याची 30 ते 50 प्रतिकिलो दराने विक्री झाली. 
कर्नाटकातील निवडणुकांमुळे आवक घटली

गेल्या आठवड्यात कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. त्यामुळे आवक रोडावली होती. गेल्या आठवड्यात सुमारे 50 हजार पेट्या आवक झाली होती. ती रविवारी अवघी 20 हजार पेट्या इतकी झाली. येत्या दोन दिवसांत निवडणुकीचे वातावरण निवळल्यानंतर कर्नाटक हापूससह इतर आंब्याच्या आवकेत वाढ होईल. 

केशर हापूसची आवक सुरू

सातारा, महाबळेश्वर आणि वाई परिसरातून केशर आंब्याची आवक सुरू झाली आहे़  रविवारी मार्केट यार्डात 200 ते 250 क्रेट आंब्याची आवक झाली़ दरम्यान, पुणे जिल्ह्यातूनही स्थानिक केशर आंबा तुरळक स्वरुपात बाजारात दाखल झाला असून, सध्या त्याला प्रतिकिलोस 40 ते 60 रुपये दर मिळत आहे. येत्या काही दिवसांत गुजरात केशर आंब्याची सुरळीत आवक सुरू होईल, अशी माहिती आंब्याचे व्यापारी संतोष ओसवाल यांनी दिली.