Wed, May 22, 2019 16:35होमपेज › Pune › ‘यशवंत’ची जमीन ‘ड्रायपोर्ट’साठी घेणार

‘यशवंत’ची जमीन ‘ड्रायपोर्ट’साठी घेणार

Published On: May 13 2018 2:16AM | Last Updated: May 13 2018 1:19AMउरुळी कांचन : वार्ताहर  

थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची 117 एकर जमीन ‘ड्रायपोर्ट’ (बंदर) प्रकल्पासाठी घेण्याचा निर्णय केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. यातून मिळणार्‍या भांडवलातून कारखाना पूर्ववत करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती शिरूर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी दिली. 

पुण्यातील विधानभवन येथे केंद्रीय वाहतूक व दळणवळण मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग व रिंग रोडच्या रखडलेल्या प्रश्‍नासंदर्भात आयोजित बैठकीत यशवंत  कारखान्यासंदर्भात हा निर्णय घेण्यात आला आहे. 

थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची 117 एकर जमीन रेडिरेकनरच्या दरात केंद्रीय ड्रायपोर्ट (बंदर) प्रकल्पासाठी घेण्याचा प्रस्ताव कारखाना अवसायक अधिकार्‍यांनी केंद्र सरकारकडे दाखल केला होता. या बैठकीत ही जमिन केंद्र सरकारने खरेदी करावी म्हणून नितिन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे चर्चा होऊन या जमीन खरेदीला गडकरी यांनी संमती दिली आहे. त्यानुसार केंद्र सरकारकडे जमीन मूल्यांकनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पाठविण्याची सूचना देण्यात आली आहे. आ. बाबूराव पाचर्णे यांनी कारखाना पूर्ववत करण्यासाठी आवश्यक भांडवल, यांत्रिक दुरुस्ती, थकित देणी, संस्थेवरील कर्ज परतफेड करण्यासाठी रेडिरेकनरच्या दरात जमीन केंद्राने खरेदी करावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे बाजू मांडली होती. त्या प्रस्तावाच्या विचारअंती केंद्रीय मंत्री गडकरी यांनी जमीन खरेदी करण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब केल्याचे आ. पाचर्णे यांनी माहिती दिली.