होमपेज › Pune › चाकूच्या धाकाने १४ लाखांचे दागिने लुटले

चाकूच्या धाकाने १४ लाखांचे दागिने लुटले

Published On: Dec 19 2017 1:16AM | Last Updated: Dec 19 2017 1:02AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

कर्वेनगर परिसरातून कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने ज्यूस विक्रेत्याला कारमध्ये बसवून नेत चाकूचा धाक दाखवून 14 लाखांचे सोन्याचे दागिने काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे, तर दागिने काढून घेतल्यानंतर त्याला खेड-शिवापूर येथे सोडून देऊन चोरटे सातार्‍याच्या दिशेने पसार झाले. ही घटना रविवारी सकाळी साडेनऊ ते साडेबाराच्या दरम्यान घडली. मुकेश वसंत शेलार (वय 52, रा. गांधी वसाहत, कर्वेनगर) यांनी तक्रार दिली.

याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात पाच जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शेलार यांचा ज्यूस विक्रीचा व्यवसाय असून, ते कर्वेनगर परिसरात राहतात. शेलार यांचा मुलगा एका गुन्ह्यात येरवडा कारागृहात आहे. कारागृहातून तुमच्या मुलाने कागदपत्रे पाठविली आहेत, असे एका व्यक्तीने त्यांना फोन करून सांगितले आणि  ती घेण्यासाठी कर्वेनगर येथील पोतनीस परिसरात येण्यास सांगितले; मात्र ती व्यक्ती तेथे आली नाही.

दरम्यान, शेलार यांच्या नातेवाइकाचे 14 डिसेंबर रोजी मुंबई येथे लग्न झाले होते. त्यानंतर 17 डिसेंबर रोजी त्यांच्या येथे सत्यनारायणाची पूजा असल्याने दागिने घालून जात होते. त्या वेळी पुन्हा एका व्यक्तीने फोन केला आणि त्यांना पोतनीस परिसरात येण्यास सांगितले. तेथे गेल्यानंतर मोटारीत जाऊन बोलू असे म्हणत घेऊन गेला. मोटारीत बसल्यानंतर चालकाने मोटार सुरू करून पुढे नेली. त्यानंतर काही अंतरावर गेल्यावर आणखी काहीजण मोटारीत बसले. चाकूचा धाक दाखवून चार सोन्याच्या साखळ्या,  सोन्याचे ब्रेसलेट, दोन अंगठ्या, रोख 50 हजार असा तेरा लाख 87 हजार रु. किमतीचा ऐवज काढून घेतला.  त्यानंतर त्यांचा मोबाईल, सीमकार्ड काढून घेत त्यांना खेड-शिवापूरच्या पुढे गेल्यानंतर सोडून दिले ते चोरटे पसार झाले. त्यानंतर त्यांनी अलंकार पोलिसांत तक्रार दिली.