Tue, Jun 25, 2019 13:07होमपेज › Pune › न्याय मागणेच बेतते आहे जिवावर

न्याय मागणेच बेतते आहे जिवावर

Published On: Jun 14 2018 1:35AM | Last Updated: Jun 14 2018 12:45AMपुणे : पुष्कराज दांडेकर 

घटना 1
खेड येथे नात्यातील मुलीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. कुटुंबीयांनी पोलिसांत विनयभंगाची तक्रार दिल्याने तरुणीच्या भावाचाच चालत्या एसटी बसमध्ये कोयत्याने वार करून खून केला.

घटना 2
महिलेने पोलिसांत दिलेली तक्रार मागे घ्यावी यासाठी  पिंपरीतील एच. ए. कॉलनीत महिलेवर गोळीबार. अ‍ॅड. सुशील मंचरकर व नगरसेविका गीता मंचरकर यांच्यावर गुन्हा दाखल.  

घटना 3
पिंपरीत किरकोळ कारणावरून वाद झाल्याने याबाबतची तक्रार पोलिसात दिल्याच्या कारणावरून तरुणाला भररस्त्यात गाठून डोळ्यात मिरचीपूड टाकत कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न. 

या वरील तीनही घटना आठवडाभराच्या काळातल्या आहेत. त्यावरून गुन्हेगार किती ‘कोडगे’ आणि संवेदनशून्य झाले आहे, तेच समोर येत आहे. ज्याच्यावर अन्याय झाला; त्याला न्याय मिळण्यापुर्वीच, तक्रार केली म्हणून हल्ले होऊ लागल्याने आरोपींवर पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचे धक्कादायक वास्तव नाकारताच येणार नाही. किरकोळ कारणावरून झालेले वाद, मारामारी आणि खून, बलात्कार, विनयभंग यांसारखे गंभीर गुन्हे शहरात घडतात. अशा गुन्ह्यांत पोलिसांत गुन्हा दाखल होणे किंवा पोलिसांनी अटक केले जाणे, याचा आरोपींना राग येतो. अशाच घटनांमघून तक्रारदारावर दबाव आणण्यासाठी आरोपींकडून त्यांच्यावर जीवघेणे हल्ले केले जात आहेत. 

पोलिसांकडून हलगर्जीपणा 

आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत दाद मागण्यासाठी गेलेल्या नागरिकाला अनेकवेळा पोलिसांकडूनच वाईट वागणूक मिळाल्याची अनेक उदाहणे आहेत. गुन्हा दाखल केल्यानंतरही पोलिस कित्येकवेळा हलगर्जीपणा करत गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अटक करत नाहीत. त्यामुळे त्यांचे धाडस वाढते. मंगळवारी खेडमध्ये झालेल्या खून प्रकरणातही असाच प्रकार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते.

‘वजन’दार आरोपींकडे पोलिसांचे दुर्लक्ष 

एखाद्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील ‘वजन’दार व्यक्ती किंवा त्यांच्या कार्यकर्त्याविरोधात तक्रार घेऊन गेलेल्या नागरिकाची तक्रार घेतली जाते खरी, पण त्यावर कारवाई होईलच याची शाश्‍वती नसते. अनेकवेळा तक्रारच दाखल करून घेतली जात नाही. आणि पोलिसांच्या या दुर्लक्षाने राजकीय व्यक्ती आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अभय मिळते. 

दहशत पसरविण्यासाठी सराइतांकडून प्रकार

काही वेळा सराईत गुन्हेगार, गुंड, परिसरात आपली दहशत पसरविण्यासाठी किंवा आपली जरब बसविण्यासाठी तक्रारदारांना धमकावणे, त्यांच्या घरात तोडफोड करणे, खून, खुनाचा प्रयत्न केला जातो. अशा गुन्हेगारांना काही वेळा पोलिसांकडून तडीपार केले जाते. मात्र परत आल्यानंतर हे गुन्हेगार अशीच कृत्ये करतात. किंबहुना ते तडीपारी भोगतात की नाही, अशीच शंका बर्‍याचवेळा येते. कारण तडीपारीच्या आदेशानंतरही हे गुन्हेगार त्याच परिसरात निर्धोकपणे फिरताना दिसतात. पण त्यांच्या दहशतीने कोणीही बोलत नाही आणि पोलिसांशी साटेलोटे करीत ते आहे त्याच ठिकाणी राहतात, असे अनेकवेळा समोर आले आहे.