Sat, Jul 20, 2019 02:26होमपेज › Pune › शेतकरी आंदोलनाची तीव्रता वाढणार

शेतकरी आंदोलनाची तीव्रता वाढणार

Published On: Jun 08 2018 1:23AM | Last Updated: Jun 08 2018 12:46AMपुणे : प्रतिनिधी

शेतीमालास हमीभाव, सरसकट कर्ज व वीज बिलमुक्ती आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनांच्या वतीने आंदोलन तीव्र करण्यात आले असून, शुक्रवार (ता. 8) मध्यरात्रीपासून शहरांकडे येणारा शेतमाल अडविण्यात येणार असल्याची माहिती किसान संघर्ष समितीचे सदस्य विठ्ठल पवार यांनी दिली. नुकसान टाळण्यासाठी शेतकर्‍यांनी त्यांचा शेतमाल बाजारात विक्रीसाठी पाठवू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

दरम्यान, शेतकर्‍यांच्या संपाला पाठींबा मिळविण्यासाठी संघटनांच्या प्रतिनिधींनी गावोगावी जाऊन, गावचे सरपंच, प्रमुख व्यक्ती व गावपातळीवर काम करणार्‍या संघटनांची गुरूवारी भेट घेतली. शेतकर्‍यांचा संप सुरू होऊन सात दिवस उलटले असले तरी, अद्यापही त्यांच्या मागण्यांसदर्भात योग्य तो निर्णय झालेला नाही. त्यामुळे, आजपासून संघटनांनी लढा तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकर्‍यांनी पुढील तीन दिवस संपामध्ये सहभागी होऊन, शेतकर्‍यांची ताकद दाखविणे गरजेचे असल्याचे पवार यांनी नमूद केले. दरम्यान, येत्या रविवारी (ता. 10) राज्यातील विविध 60 ते 70 ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय किसान महासंघ, शरद जोशी विचारमंच, शेतकरी संघटना, प्रहार संघटना, मराठा सेवा संघ, किसान सभा, किसान क्रांती व अन्य संघटनांच्या वतीने शेतीमालास हमीभाव, सरसकट कर्ज व वीज बिलमुक्ती आदी मागण्यांसाठी 1 ते 10 जून या कालावधीत देशव्यापी संपाची घोषणा करण्यात आली आहे. संपादरम्यान संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी, कृषी, सहकार, दुग्ध, पशुसंवर्धन व साखर या पाचही आयुक्तांकडे निवेदने दिली आहेत. राज्यसरकारला पाकिस्तानची साखर, कांदा, परदेशी तूर, गुजरातचे दूध, टोमॅटो भेट देऊन, निषेध व्यक्त करण्यात आला आहे. याखेरीज राज्यात विविध ठिकाणी संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात येत असलेल्याचेही विठ्ठल पवार यांनी सांगितले.